आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक: मतदार परिवर्तन करणार की चव्हाण यांना कायम ठेवणार? जिल्हा परिषद, पंचायत समिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री - संपूर्ण फुलंब्री तालुक्याचे लक्ष गणोरी जिल्हा परिषद गटाकडे लागून आहे. या गटात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मैत्रीचा हात पुढे करत एकच उमेदवार दिल्यामुळे विद्यमान जिल्हा परिषद सदस्या अनुराधा चव्हाण यांना मोठे आव्हान उभे राहणार आहे.  

गणोरी जिल्हा परिषद गटात औरंगाबाद-जळगाव व फुलंब्री-वेरूळ असे दोन महामार्ग येतात. या मतदारसंघात आतापर्यंत कोणत्याच उमेदवाराने दुसऱ्यांदा बाजी मारली नाही. गतवेळी हा गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होता. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुराधा चव्हाण, काँग्रेसकडून सीमा बोरसे, शिवसेनेकडून तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, तर भाजपकडून इलियास शहा हे मैदानात होते. अनुराधा चव्हाण त्या वेळी राजकारणात नवख्या असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनशक्तीच्या जोरावर त्यांनी काँग्रेसच्या सीमा दादासाहेब बोरसे यांचा पराभव केला होता. या तुल्यबळ लढतीमध्ये राजेंद्र ठोंबरे याना चार हजारच्या जवळपास मतदारांनी मतदान केले होते. केवळ थोडे दुर्लक्ष केल्याने ठोंबरे यांचा पराभव झाला होता. अन्यथा अनुराधा चव्हाण यांना ही निवडणूक अत्यंत जड गेली असती.  

या वेळी अनुराधा चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जय राष्ट्रवादी करून भाजपचे कमळ हाती घेतले आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनीसुद्धा इमाने इतबारे रईस व काबिल उमेदवार म्हणून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी बहाल केली आहे. चव्हाण यांचे वैशिष्ट्ये म्हणजे त्या कायम जनतेच्या संपर्कात राहतात व गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेसकडून या वेळी गणोरी येथील माजी सरपंच तथा देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक गणेश तांदळे यांच्या पत्नी पुष्पा गणेश तांदळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा चव्हाण यांच्यावर राग काढण्यासाठी मुद्दामहून उमेदवार न देता काँग्रेसच्या पाठीशी बळ उभे केले आहे. पुष्पा गणेश तांदळे यांचे कुटुंब सुरुवातीपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विचाराशी सुसंगत आहे. पुष्पा तांदळे यांचे सासरे राधाकिसन तांदळे यांनी गणोरी गटाचे प्रतिनिधित्व करून जिल्हा परिषदेत सभापती म्हणून काम केले आहे, तर त्यांचे पती गणेश तांदळे यांनी पाच वर्षे अतिशय कमी वयात गणोरीचे सरपंचपद भूषवले आहे. त्यामुळे ही लढत काट्याची होऊ शकते. शिवसेनेकडून येथे लताबाई तांदळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गणोरी गणात राष्ट्रवादीकडून मुक्ताबाई सुरेश बोलकर, तर वानेगाव गणातून बाजार समितीचे विद्यमान सभापती संदीप बोरसे यांच्या लहान भावजय सीमा दादासाहेब बोरसे यांना काँग्रेस उतरवण्यात आले आहे. आगामी सभापतिपद हे सर्वसाधारणसाठी आरक्षित असल्यामुळे आता दुधाची तहान ताकावर भागवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पंचायत समिती गणाची लढतसुद्धा प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपच्या चव्हाण यांच्यासोबत गणोरी गणातून सोनाली सोनवणे, तर वानेगाव गणातून वारेगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच एकनाथ धटिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धटिंग हे फुलंब्रीचे माजी सरपंच तथा भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास शिरसाठ यांचे खंदे समर्थक समजले जातात. त्यामुळे शिरसाठ हे तिन्ही उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची शक्यता आहे.   

शिवसेनेकडून लताबाई तांदळे यांच्यासोबत बाजार समितीचे संचालक नामदेव काळे यांच्या पत्नी सुनीता काळे, तर वानेगाव पंचायत समिती गणातून शिरोडीच्या सरपंच चंद्रकला देविदास काथार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खरे तर चंद्रकला काथार या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार होत्या, मात्र शेवटच्या अर्ध्या तासात काथार यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी सेनेत प्रवेश केला. हे सर्व उमेदवार तुल्यबळ असले तरी खरी लढत काँग्रेस-भाजपच्या उमेदवारांतच होणार आहे. गणोरी गटाचा इतिहास पाहता येथील मतदार दुसऱ्यांदा कुणालाच जिल्हा परिषदेत पाठवत नाही, मात्र चव्हाण या गेल्या पाच वर्षांच्या कामाच्या जोरावर विजय मिळवतात की तांदळे या आपल्या कुटुंबाच्या पुण्याईवर विजय मिळवतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा ,मित्रपक्षाच्या उमेदवारावर सेना, राकाँचे विजयाचे गणित...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...