आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या ‘दप्तरातल्या कविता’; जीव जाळीत पोळीत, बाप राबत राहिला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अरे पावसा पावसा ऐक आमुचा उसासा

येई धावत जोरात नेई दुष्काळ पुरात


या ओळी काय किंवा थेट श्रेष्ठ साहित्यिकांना प्रश्न विचारणार्‍या

सर्वच कवी म्हणतात आई श्रेष्ठ आई श्रेष्ठ

कोणी पाहिलेत का बापाचे पण कष्ट?


या ओळी कुणा प्रख्यात कवींनी लिहिलेल्या नाहीत तर चौथी ते सातवीच्या वर्गात शिकणार्‍या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे कल्पनाविश्व समोर आणणारा ‘दप्तरातल्या कविता’ हा कवितासंग्रह अशा कवितांनी नटलेला आहे.

माजलगावच्या गट शिक्षणाधिकारी आणि कवयित्री तृप्ती अंधारे यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग केला आहे. माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना पत्र पाठवून मुलांकडून त्यांना वाटतील त्या विषयावर कविता लिहा असे आवाहन अंधारे यांनी केले होते. दोन महिन्यांत दीडशेहून अधिक कविता आल्या आणि ग्रामीण भागातील मुलांची प्रतिभेची झेप समोर आली. पुण्याच्या एका प्रकाशनाने हा कवितासंग्रह प्रकाशित केला. बहुजन समाजातील, शेतकरी कुटुंबातील मुले खास करून मुली यांना साहित्य लेखनाची आवड असल्याचे तर यातून दिसतेच, पण त्यांना प्रोत्साहन दिल्यास ते साहित्याकडे वळू शकतील.

थक्क करणारे विषय : महादेव फुलवरे या बेलुरा येथील विद्यार्थ्याने ‘गळफास’ कवितेत शेतकरी आत्महत्येवर लिहिले आहे. तो म्हणतो-

दिला आपला प्राण, एका झाडाला रस्सी बांधून

जीव जाळीत पोळीत, बाप राबत राहिला


शिकायचे आहे पण परिस्थितीचा अडथळा आहे. या चिमुकल्यांना त्याची पण जाणीव आहे. जदीद जवळा येथील मनीषा बापमारे हिने लिहिलेल्या ओळी अस्वस्थ करतात -

गणवेश दप्तर मागू कशी

फाटका ड्रेस घालू कशी

बापाची फजिती दिसते डोळ्याला

जाईन म्हणते शाळेला


तर स्वप्नाली टाले हिने बाप या कवितेतून आईवर कविता लिहिणार्‍या साहित्यिकांनाच कडक प्रश्न केला आहे. ती म्हणते -

सर्वच कवी करतात आईवर कविता

कोठे गेला हा बाप सांगा मला आता?