आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद तालुक्यातील पाच गटांत पंजाला कौल; कमळ दुसऱ्या स्थानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद तालुक्यातील १० पैकी ५ गटांत काँग्रेस उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी विजयी उमेदवारांना पेढे भरवून महिनाभर देहभान हरपून श्रमणारे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत जल्लोष केला. - Divya Marathi
औरंगाबाद तालुक्यातील १० पैकी ५ गटांत काँग्रेस उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी विजयी उमेदवारांना पेढे भरवून महिनाभर देहभान हरपून श्रमणारे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत जल्लोष केला.
औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक 23 जागा जिंकणाऱ्या  भाजपचा विजयी वारू औरंगाबाद तालुक्यात काँग्रेसने रोखला. तालुक्यातील 10 गट व 20 गणांत काँग्रेसने निर्विवाद आघाडी घेतली असून 10 गटांपैकी पाच ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. दुसऱ्या स्थानी आलेल्या भाजपला तीन ठिकाणी विजय मिळाला, तर आरपीआय अन् शिवसेनेच्या प्रत्येकी एका उमेदवारालाही विजयी गुलाल लागला.
 
काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना गड राखण्यात यश मिळाले असून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना तालुक्यात फारसा करिष्मा दाखवता आलेला नाही.
 
विजयापुढे फिका उन्हाचा कडाका  
निकालाच्या पूर्वसंध्येलाच २०० पोलिस अधिकारी व कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. ठरावीक अंतरावर बॅरिकेड्स लावले होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोजक्या पदाधिकाऱ्यांनाच मतमोजणीच्या ठिकाणापर्यंत प्रवेश दिला जात हाेता. उर्वरित सर्व कार्यकर्ते पूर्व व पश्चिम गेट परिसरात थांबून लाउडस्पीकरद्वारे घोषित होणाऱ्या निकालाकडे लक्ष देऊन होते. ३६ अंश सेल्सियस तापमान असूनही निकालाच्या उत्सुकतेमुळे कार्यकर्त्यांनी परिसरातच तळ ठोकला होता. मतमोजणी शांततेत पार पाडण्यात चारशे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

भाजपचा संयमी पलटवार - तेव्हा तुम्ही फटाके फोडले, आता आम्ही सांत्वनासाठी येऊ
शिवसेना-भाजप युती तोडण्याची घोषणा होताच सेनेच्या वतीने गुलमंडीवर फटाके फोडण्यात आले होते. भाजपने त्याला प्रत्युत्तर दिले नव्हते. निकालानंतर आम्ही त्यांच्या सांत्वनासाठी जाऊ, असे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी तेव्हा म्हटले होते. गुरुवारी ‘निकाल’ लागताच ‘खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह सेनेच्या स्थानिक नेत्यांचे सांत्वन करण्यासाठी उद्या आम्ही जाणार आहोत’, अशी प्रतिक्रिया तनवाणी यांनी दिली. मुंबईत शिवसेनेच्या जागा वाढल्या असल्या तरी ते स्वबळावर सत्ता मिळवू शकले नाही, दुसरीकडे भाजपने गरुडझेप घेतली. औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना गतवेळपेक्षा कमी जागा मिळाल्या. 

त्यामुळे सेनेतील कर्तीधर्ती दु:खात बुडाली आहेत. त्यांना सांत्वनाची गरज असल्याने भाजपचे कार्यकर्ते त्यांच्याकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. युती तुटली म्हणजे एकहाती सत्ता येईल, असे वाटल्याने पूर्वी सेनेचा बालेकिल्ला असलेल्या गुलमंडीवर फटाके फोडण्यात  आले होते. अलीकडच्या काळात सेनेला भाजपकडून लगेच प्रत्युत्तर देण्यात येते. परंतु फटाके फोडण्याच्या कृतीला प्रत्युत्तर देण्यात आले नव्हते. त्याला सांत्वनाने उत्तर देण्याचे आता भाजपने ठरवले आहे.

भगव्या वादात रिपाइंचा ‘डेमोक्रॅटिक’ विजय
औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत प्रारंभीपासूनच चर्चा होती ती शिवसेना आणि भाजपचीच. इतर पक्ष चर्चेपासूनही दूर फेकले गेले होते. अशा स्थितीत शहराचाच भाग असलेल्या  पंढरपूर गटातून शिस्तबद्ध  प्रचार करत रिपाइंचे (डी) रमेश गायकवाड यांनी विजय मिळवला. जिल्हा परिषदेच्या ६२ सदस्यांपैकी ६० सदस्य हे भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे आहेत. बिडकीन येथून मनसेचा एक उमेदवार विजयी झाला आणि कोणत्याही पक्षीय पाठबळाशिवाय विजय मिळवणारे गायकवाड हे दुसरे सदस्य ठरले.
 
गतवेळी गायकवाड येथूनच पराभूत झाले होते.  त्यानंतरही मतदारसंघातील संपर्क त्यांनी कमी होऊ दिला नाही. निवडणुकीचा प्रचारही त्यांनी खूप आधीपासून सुरू केला. शिवसेना, भाजप, काँग्रेस उमेदवारांच्या रोज सभा होत असताना ते घरोघर प्रचार करत होते. तरीही ते विजयी होतील, असा अंदाज अन्य कोणत्याही  उमेदवाराने बांधला  नव्हता. ते दुर्लक्षित उमेदवार होते. मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्याच फेरीत त्यांच्याकडे  लक्ष गेले आणि प्रारंभीपासून त्यांनी घेतलेली आघाडी कायम राहिली. 

त्यांना ५ हजार ४५७ मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावरील सेना उमेदवार उत्तम राठोड यांना ३३०३ मते मिळाली. दोन  हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने ते विजयी झाले. गतवेळी गायकवाड हे पराभूत झाले होते तरीही त्यांच्या  मतांची संख्या लक्षणीय होती. निवडणूक संपल्यानंतरही आम्ही मतदारांच्या संपर्कात होतो. त्यामुळेच  या वेळी विजयाची खात्री होती, असे पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक कैलास गायकवाड यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, औरंगाबाद तालुक्‍यातील दहा गटातील कौल 
 
 
बातम्या आणखी आहेत...