आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि. प. अध्यक्षाची आज निवड;मनसेने आघाडीला दिला पाठिंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी आघाडी आणि युतीमध्ये भरपूर रस्सीखेच झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही अध्यक्षपदाचा हट्ट धरला होता. आडवाआडवीच्या राजकारणानंतर सोमवारी अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. मनसेने आघाडी धर्म पाळण्याचे निश्चित केले असून आठही सदस्य आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील.

काँग्रेसने शारदा जारवाल यांना उमेदवारी दिली असून शिवसेनेनेही उमेदवार उभे करण्याचे निश्चित केले असले तरी नाव गुपित ठेवण्यात आले आहे. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सोमवारी सकाळी 11 वाजता नामनिर्देशनपत्र भरण्यापासून प्रारंभ होणार आहे. प्रत्यक्ष मतदान दुपारी दोन वाजता हात उंचावून होईल. अध्यक्षपदाच्या विजयी उमेदवाराचे नाव न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जाहीर करण्यात येणार नाही. माजी जि.प. अध्यक्षा नाहिदबानो पठाण यांचे पद रिक्त झाल्यानंतर मनसेने अध्यक्षपदासाठी वाटाघाटी करण्याचे प्रयत्न केले. सहा दिवसांपासून मनसेचे सहा सदस्य मुंबई आणि नाशिकमध्ये ठाण मांडून होते. मात्र, राज ठाकरे यांनी आघाडी सोबत राहून त्यांनाच पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर सर्वच सदस्यांनी रविवारीच औरंगाबाद गाठले. आघाडीने तीन दिवसांपूर्वी बैठक घेऊन उमेदवार जाहीर केला व ऐनवेळी पळवापळवी होऊ नये म्हणून सर्व सदस्यांना सहलीला पाठवण्यात आले. सर्वांची नाशिकमधील थ्री स्टार हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. एका सदस्याच्या रूमसाठी साडेचार हजार रुपये दिवसाचे भाडे देण्यात आले. त्यांनी तीन दिवस तेथे मुक्काम ठोकल्याचे सूत्रांनी सांगितले. तीन महिला सदस्यांनी शहरात राहणे पसंत केले. मतदानापूर्वी सर्व सदस्य शहरात दाखल होतील.