आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानापमानानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषद अध्यक्षपदी अखेर काँग्रेसच्या शारदा जारवाल यांची निवड झाली आणि मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. अध्यक्षपदासाठी मनसे अडून बसली होती, तर युतीनेही हे पद मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, परंतु पक्षर्शेष्ठींकडून आदेश मिळाल्यानंतर मनसेच्या आठही सदस्यांनी आघाडीला मतदान केले.

सोमवारी निवडणुकीच्या वेळेपर्यंत मनसेच्या सदस्यांचे मानापमान नाट्य रंगले. दुपारपर्यंत आघाडीच्या सदस्यांना पक्षाकडून मतदानासाठी बोलावले जात होते. मात्र, मनसेच्या पाच सदस्यांनी कुणी निमंत्रण देत नसल्याने अडीच वाजेपर्यंत सभापतींच्या दालनात बसणे पसंत केले. मतदानाची वेळ संपत आल्याने माजी जि. प. अध्यक्षा नाहिदबानो पठाण यांचे पती फिरोज पटेल यांनी सदस्यांची मनधरणी करून मतदानासाठी बोलावले. त्यानंतर पटेल पुन्हा मुख्यालयाबाहेर पडले. मनसेचे दोन्ही सभापती आणि दीपाली काळे सभागृहात वेळेवर उपस्थित होत्या.

निवडणुकीपूर्वी लाखोंच्या सहली :आघाडीच्या 26 सदस्यांची चार दिवसांपासून सहल सुरू होती. या कालावधीत सर्व सदस्य नाशिक येथील एसी हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. एका सदस्यावर दिवसातून किमान सहा ते सात हजार रुपये खर्च झाल्याची चर्चा मुख्यालयात होती. तसेच मनसेचे सदस्य 20 ऑगस्टपासून बाहेरच होते. कधी मुंबईत तर कधी नाशिकला मुक्काम करावा लागल्याने त्यांनाही चार लाखांपर्यंत खर्च आल्याचे बोलले जाते. मनसेचे सर्व सदस्य रविवारीच औरंगाबादमध्ये दाखल झाले. आघाडीच्या सदस्यांची बस थेट मुख्यालयात सोमवारी दुपारी एक वाजता आली.

महिला सदस्यांच्या पतींचीच गर्दी :मतदानासाठी 30 महिला सदस्यांची उपस्थिती होती. त्यात त्यांच्या पतीराजांची उपस्थिती असल्याने जिल्हा परिषद परिसरात गर्दी झाली होती.