आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या मुलाखतीला पतीही हजर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेने आजपासून इच्छुकांच्या मुलाखतींना प्रारंभ केला. निम्म्या जागा महिलांसाठी आरक्षित असल्याने महिलांची मोठी गर्दी दिसत होती. विशेष म्हणजे पत्नी मुलाखत कशी देणार याची चिंता असल्यामुळे पतीराजांनी त्यासाठी मदत केली. पक्षानेही पतींच्या उपस्थितीला हरकत घेतली नाही.
येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या एका दालनात शिवसेनेच्या वतीने मुलाखतींना सुरुवात झाली. उपनेते विश्वनाथ नेरूरकर आणि चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि नरेंद्र त्रिवेदी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता पगारे, महापौर अनिता घोडेले, माजी उपमहापौर लता दलाल यांनी मुलाखती घेतल्या.
ऐनवेळी सर्कल, गण आरक्षित झाल्यामुळे पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न चालवले. राजकारणाचा गंध नसलेली पत्नी कशी मुलाखतीला सामोरी जाणार याची चिंता असल्यामुळे पतीराज स्वत: मुलाखतीला सामोरे गेले. पक्षानेही त्यांना आक्षेप घेतला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची एक मोठी चिंता मिटली. पहिल्या दिवशी वैजापूर, गंगापूर आणि पैठण या तीन तालुक्यांतील गण, गटांसाठी मुलाखती झाल्या. उद्या उर्वरित सहा तालुक्यांसाठी मुलाखती होणार आहेत.