आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिऊर गटात जिल्हा परिषद उमेदवारीसाठी चढाओढ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिऊर - मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीचे वारे शिऊर गटात जोरात वाहत असून इच्छुकांनी उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे, सर्वसामान्य मतदारांमध्ये कोणाला उमेदवारी मिळते व कोणता उमेदवार जिंकू शकतो, या चर्चेला उधाण आले आहे.
शिऊर गट 15 वर्षांनंतर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी सुटल्याने या गटातील दिग्गज नेतेमंडळींनी आपापल्या बायकोला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसकडून शोभा निकम, सरस्वती जाधव, भाजपकडून हर्षला एकनाथराव जाधव, शिवसेनेकडून आनंदी अन्नदाते यांनी तयारी सुरू केली आहे.29 गावे व 31 हजार मतदार असलेल्या गटात रस्ता, आरोग्य, शिक्षण, वीज पुरवठा हे महत्त्वाचे प्रश्न उभे आहेत. प्रश्न सोडवणारा उमेदवार निवडून देण्यासाठी मतदारही इच्छुकांवर नजर ठेऊन आहेत.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी करण्यासंदर्भात, तर शिवसेना- भाजप युती करण्यासंदर्भात बैठका घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. वैजापूर नगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता घेतली, जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीतही आघाडी होण्याच्या मार्गावर आहे. पंचायत समितीचे शिऊर व पोखरी हे गण खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी आहेत. शिऊर गणासाठी काँग्रेसचे जे. के. जाधव, राजेंद्र जाधव, चंद्रशेखर देशमुख शिवसेनेकडून दिलीप जाधव, नंदकिशोर जाधव, सुशील देशमुख, शिवाजी साळुंंके भाजपकडून विवेक जाधव, रामेश्वर जाधव, राष्ट्रवादीकडून सुभाषचंद्र जाधव, नवनाथ आढाव, दादासाहेब जाधव, तसेच मनसेकडून सुनील सुरासे हे उमेदवारी मिळवण्यास इच्छुक आहेत.
प्रतिष्ठेची लढाई - गेल्या वेळी शिऊर गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात व सध्या काँग्रेस पक्षात असलेले रामहरी जाधव निवडून आले होते. शिऊर गणातून काँग्रेसच्या शोभा बागुल,पोखरी गणातून राष्ट्रवादीच्या संगीता भोसले निवडून आल्या होत्या. आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. शिवसेना भाजपही शिऊर सर्कलमधील सर्व तिन्ही जागा ताब्यात घेण्यासाठी आपली शक्ती पणाला लावणार आहे. या गटातील निवडणूक उत्कंठा वाढवणारी ठरणार आहे.
* उमेदवार भ्रष्टाचारी नसावा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वात पहिला निकष आहे. स्वत:च्या व्यवसायासाठी, प्रतिष्ठेच्या व हव्यासासाठी काम करणा-यास उमेदवारी मिळणार नाही.प्रत्यक्षात कामे करणारा, समाजकारणी उमेदवार निवडणुकीत उतरवण्यावर भर असेल. - भाऊसाहेब पा. चिकटगावकर, जिल्हा कार्याध्यक्ष, रा.काँ.पा.
* वैजापूर तालुक्यातील सर्वच जागा लढवण्याची आमची तयारी झाली आहे. युतीबाबत जिल्हास्तरावर चर्चा सुरू आहे. वरिष्ठांकडून सूचना येईपर्यंत कोणतेही धोरण ठरवले जाणार नाही. शिवसेनेशी प्रामाणिकता, जनमानसात मिसळून सर्वसामान्यांची कामे करणारा या बाबी लक्षात घेऊनच उमेदवाराची निवड केली जाईल. - आमदार आर. एम. वाणी, (शिवसेना)