आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेहूर गटात योग्य उमेदवारांसाठी पक्षश्रेष्ठींची दमछाक, चाचपणी सुरू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड - कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषदेचा जेहूर गट अनुसूचित जाती-जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. सलग तीन वेळा शिवसेनेकडून बाजी मारणारे डॉ. अण्णा शिंदे यांनी याच गटातून जिल्हा परिषदेसाठी प्रतिनिधित्व करत जि. प. उपाध्यक्ष व अध्यक्षपदांपर्यंत मजल मारली होती. योग्य उमेदवारांच्या शोधार्थ सर्वच राजकीय पक्षांची यंत्रणा कामास लागली आहे.
या वेळी जेहूर गट अनुसूचित जाती-जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने डॉ. अण्णा शिंदे यांचा हिरमोड झाला आहे. जेहूर गटावर सध्या शिवसेनेचे वर्चस्व आहे. एकेकाळी काँग्रेसचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. येथे कै. बाबूराव औराळकर, कै. नारायण पवार यांचे वर्चस्व होते. यांच्यानंतर डॉ. अण्णा शिंदे यांनी स्वत:चे प्रस्थ निर्माण केले आहे.
पंचायत समिती जेहूर गणात शिवसेनेकडून निवडून येऊन उपसभापतिपद मिळवलेले गीताराम पवार यांनी मनसेत प्रवेश केल्याने येथील समीकरणे बदलली आहेत. पवार यांच्यासोबत माजी सभापती अन्नपूर्णा मिसाळ, चिंधा पवार, बाळू निकम, नवनाथ भुरे व इतर कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेची ताकद वाढली आहे.
औराळा गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. काँग्रेसकडून शर्मिला थोरात, रंजना देशमुख, शिवसेनेकडून हिराबाई शिंदे, मनसेतर्फे संगीता पवार, सोनाली बोरसे, राष्ट्रवादीतर्फे अनिता चव्हाण, सोनाली भोजने, ललिता नलावडे आदी उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.
प्रत्यक्ष राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना डावलले जाण्याची दाट शक्यता असल्याने या गणांमधून बंडखोरीचे प्रमाण अधिक राहण्याचे संकेत मिळत आहेत. बंडखोरीस आळा घालण्यासाठी तसेच आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी सक्षम उमेदवारांना उमेदवारी देण्याकरिता सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन व त्यांची मते जाणून घेऊन चर्चासत्र सुरू केले आहे.
औराळा गणात कै. नारायण पवार यांचे नातेसंबंध व कार्यकर्त्यांचा फौजफाटा असल्याने काँग्रेसतर्फे पुष्पाताई पवार या प्रबळ दावेदार आहेत. मनसे प्रवेश, शिवसेनेचे डॉ. अण्णा शिंदे यांचा दांडगा जनसंपर्क, कै. नारायण पवार यांचे वर्चस्व याचबरोबर युती व आघाडी याबाबतचा निर्णय आणि जाहीर झालेल्या आरक्षणामुळे जेहूर गटात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.