आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणूक उमेदवारीसाठी चोपडेंचे तळ्यात-मळ्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नाहिदाबानो यांच्या जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवण्यासाठी न्यायालयीन लढय़ाला यश आले असले तरी पराभूत उमेदवार अनिता चोपडे यांचे जिल्हा परिषदेच्या सातारा सर्कलमधून पोट निवडणूक लढवण्यासाठी अजून तळ्यात-मळ्यात आहे. लढायचे की नाही लवकरच ठरवू, असे त्यांचे पती तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश चोपडे यांनी सांगितले.

गुरुवारी सायंकाळपर्यंत 14 इच्छुकांनी मिळून 24 अर्ज ताब्यात घेतले होते, तर शमीमबी महेबूब चौधरी यांनी आज उमेदवारी अर्ज सादर केला. शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

महिला ओबीसी प्रवर्गासाठी हे सर्कल आरक्षित आहे. 2011 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या नाहिदाबानो येथून विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेनेच्या चोपडे यांचा पराभव केला. नाहिदा यांचे मोमीन जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार करत चोपडे यांनी थेट उच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. नाहिदा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबरोबरच त्यांचे सदस्यत्वही गेले. त्यामुळे येत्या 27 ऑक्टोबरला येथे पोटनिवडणूक होत आहे. या वेळी चोपडे पुन्हा लढतील असे सर्वांनाच अपेक्षित आहे. मात्र, लढण्याचा निर्धार अजून तरी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. चोपडे यांच्या वतीने कोणीही अर्ज ताब्यात घेतलेला नाही.

काँग्रेसबरोबर शिवसेनेकडून अद्याप उमेदवार निश्चित होऊ शकलेला नाही. चोपडे यांनी आपल्याकडे अधिकृतपणे उमेदवारी मागितली नसली तरी पक्षादेशानुसार निर्णय घेतला जाईल. उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवस शिल्लक असल्याने उद्या सायंकाळपर्यंत उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले.