आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प. निवडणुकांसाठी वाळूज सर्कलमधून इच्छुकांची एकच गर्दी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी वाळूज सर्कलमधून विविध पक्षांतील इच्छुकांनी भाऊगर्दी केली आहे. सुमारे सव्वाशेवर इच्छुक उमेदवार आपणच सक्षम असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
वाळूज सर्कलमध्ये जिल्हा परिषदेची एक आणि पंचायत समितीच्या वाळूज आणि लिंबेजळगाव अशा एकूण तीन जागा आहेत. या तीन जागांसाठी सुमारे सव्वाशे इच्छुक आहेत. जिल्हा परिषदेची जागा सर्वसाधारण महिलेसाठी, तर पंचायत समितीच्या जागा या सर्वसाधारण पुरुषांसाठी आरक्षित आहेत. काँग्रेसमधून जिल्हा सरचिटणीस नंदकुमार गांधिले पाटील हे पत्नी कल्पना यांच्यासाठी, तर तालुका उपाध्यक्ष शिवप्रसाद अग्रवाल हे पत्नी लीना यांच्यासाठी तिकिटे मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. माजी सरपंच सईदा पठाण, शेख जमील अहेमद, गोरख जैस्वाल, इर्शाद इनामदार, नदीम झुंबरवाला यांची नावेही चर्चेत आहेत.
शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार अण्णासाहेब माने, तालुकाप्रमुख प्रकाश दुबे यांच्या उपस्थितीत निर्धार बैठक घेतली. शहरप्रमुख नंदकुमार राऊत यांनी आरक्षण सर्वसाधारण गटासाठी असल्याने उमेदवारी देताना त्याच गटातील उमेदवाराचा विचार करण्याची मागणी केली तरीही इतर गटातील अनेकांनी आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे मत मांडले. त्यात विद्यमान सरपंच मंजूषा जैस्वाल, उज्ज्वला नंदकुमार राऊत, मुक्ताबाई देसाई, लताबाई इले, लताबाई साहेबराव गावंडे, रंजना भोंड, उषा बोरकर, पद्माबाई गवांदे यांनी नावे नोंदवली. पंचायत समितीसाठी मनोज पिंपळे, बबन राऊत, ज्ञानेश्वर बोरकर, शिवाजी पडघन, बाळू चनघटे, नंदकुमार राऊत, अनिल तुपे, एकनाथ निर्फळ, नंदू वाणी यांच्या नावांची चर्चा आहे.
आमदार प्रशांत बंब गटाची बैठक त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी वाळूजला झाली. गोरख शेळके धामोरीकर यांच्या पत्नी, सुवर्णा उत्तम शिंदे, शंकर पारधे, ताराचंद मोरे, सुनील गंगवाल, रमेश क ासलीवाल, रामदास परोडकर, नंदू सोनवणे, रज्जाक शेख यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसशी युतीसंदर्भात बोलणी सुरू आहे. बोलणी यशस्वी होण्याची शक्यता असल्यामुळे उमेदवारीचा निर्णय दोन दिवसांनी घेणार असल्याचे आमदार बंब यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नारायणपूरचे सरपंच नासेर पटेल, वलीमियाँ पीरसाब, पाठे कॉन्ट्रॅक्टर,चंद्रकांत पवार, अन्सारखाँ मुसाखाँ पठाण हे पत्नीला उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, जिल्हा पातळीवरील निर्णयानंतर उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत इच्छुकांची मते शुक्रवारी जाणून घेण्यात आली. सुशीलाबाई राजाराम काकडे, विमल काकासाहेब चापे, आशाबाई हरिदास नेव्हाल, रवी पाटील मनगटे, फारूक कुरेशी, अरुण गायकवाड, सचिन पाटील काकडे, दत्ता निर्फळ, उमर पटेल यांनी नावांची नोंद केली. 17 जानेवारीला इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. याशिवाय पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अनेक जण अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.