आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिऊरचा गड जिंकण्यासाठी मातब्बरांची धावपळ सुरू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिऊर - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक काही आठवड्यांवर येऊन ठेपल्याने शिऊर गटात राजकीय समीकरणे गतिमान झाली आहेत. काही इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांच्या प्रयत्नांना वेग आला आहे.
शिऊर गट खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी, तर शिऊर व पोखरी गण खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात मातब्बरांनी निवडणुकीचा गड जिंकण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी आणि शिवसेना-भाजपमध्ये युती होण्याची शक्यता कमी असल्याने चारही पक्षांच्या उमेदवारांनी कंबर कसली आहे. गेल्या वेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे शिऊर गटावर आपला हक्क असल्याचे राष्ट्रवादीने सांगितले. यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब चिकटगावकर यांनी पत्नी विजयाताई चिकटगावकर यांच्यासाठी तयारी केली आहे, तर काँग्रेसकडून जिल्हा उपाध्यक्ष संजय निकम यांच्या पत्नी शोभाताई निकम यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून त्यादृष्टीने त्यांनी बैठका घेऊन प्रचार यंत्रणा राबवायला सुरुवात केली आहे. शिऊर गणासाठी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जे. के. जाधव यांनी उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असली तरी तालुका खरेदी -विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु आहे. शिवसेना-भाजपमध्ये वैजापूर तालुक्यात अनेक वर्षांपासून बिनसलेले असले तरी या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची युतीबाबत अनुकूलता आहे. मात्र, शिवसेना आमदार आर. एम. वाणी व भाजप नेते एकनाथ जाधव यांच्यात सुंदोपसुंदी असल्याने कार्यकर्त्यांना गप्प बसावे लागत आहे. येणा-या निवडणुकीत ‘दोघांच्या भांडणात तिस-याचा फायदा’ होऊ नये म्हणून युती व्हावी, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. भाजपची तालुक्यात सहा जागांसाठी मागणी आहे.
शिऊर गट, लासूरगाव गट व तेथील प्रत्येक गटातील दोन पंचायत समिती गण अशा मिळून सहा जागा आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती गत निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर होते. त्यात शिवसेनेने सातपैकी पाच गट ताब्यात घेतले होते. शिऊर गटातून सेनेच्या वतीने महिला आघाडी आनंदीताई अन्नदाते यांनी मतदारांच्या भेटी घेण्याचा धडाका सुरू केला आहे, तर भाजपकडून हर्षला जाधव प्रचार सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत.
पंचायत समिती शिऊर गणासाठी शिवसेनेकडून इच्छुक असलेले दिलीप जाधव यांनी आपल्या शेतवस्तीवर निर्धार बैठक घेऊन उमेदवारी मिळवण्याकडे पहिले पाऊल टाकले आहे, तर भाजपचे माजी जि. प. सदस्य सुनील पैठणपगारे हे पंचायत समिती गणासाठी उमेदवारीबाबत तरुण चेह-यांना संधी देण्यासाठी रामेश्वर जाधव, विवेक जाधव यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत. याशिवाय मनसे शहराध्यक्ष सुनील सुरासे हे गटातील पक्षाचे एकमेव उमेदवार तयारीत आहेत. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात चौरंगी लढत होण्याची शक्यता राजकीय कार्यकर्ते वर्तवत आहेत.