आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाला पत्नीसाठी, मुलीसाठी तर कुणाला भावजयीसाठी हवी उमेदवारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राजकारणात कधी काय होईल आणि नेते काय करतील हे सांगताच येत नाही. सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी अनेक वर्षापासून तयारी केलेल्या भावी नेत्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणामुळे मतदारसंघ बदलावे लागले. तर काहींनी पत्नीच्या, मुलीच्या, सुनेच्या आणि भावजईच्या नावे उमेदवारी मागण्यासाठी शक्ती पणाला लावली. सोमवारी झालेल्या तीन पक्षाच्या मुलाखतीदरम्यान नातेवाइकांना उमेदवारी कशी मिळेल यासाठी अनेक नेत्यांनी उचापती केल्या. या उचापतीसमोर काही पक्षाचे वरिष्ठ प्रभावित झाले तर काहींचे पत्तेच कट झाले.
भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ‘रिपाइं’च्या नेत्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीच्या वेळी नेहमीप्रमाणे नेत्यांनी उचापती केल्या. पक्षाचा फॉर्म भरल्यानंतर मुलाखतीसाठी पुकारा होताच महिलाऐवजी पुरुषच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजर झाले. मुलाखत कक्षात दाखल होताच तुम्ही कोणासाठी आलात, फॉर्मवरील महिला तुमच्या कोण ? असे विचारल्यावर त्या भावी नेत्यांनी गमतीशीर उत्तरे दिली. पत्नीचे आजोबा आजारी आहेत, गावात लग्न आहे, तुम्ही तिकीट द्या तिला निवडून आणण्याची जबाबदारी माझी अशी
उत्तरे दिली.
मुलाखत घेणा-या नेत्यांनी तडजोड करीत कार्यकर्त्यांना नाराज करणे टाळले आणि प्रश्नांचा उलट भडिमार केला. तुमच्यासह त्या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत. शेवटी एकाच्याच नावावर निर्णय होईल. नंतर तुम्ही बंडखोरी करणार नाही असे लिहून द्या, पत्नीचे शिक्षण आणि पक्षाची माहिती आहे का? असे प्रश्न करीत उमेदवारांना विजयी होण्याअगोदरच पराभवाचा अनुभव नेत्यांनी दिला.
भाजप आणि मनसेकडे शिक्षित उमेदवारांची गर्दी - माझी पत्नी शिक्षित असल्याने ती निवडून येणारच असे म्हणत बहुतांश उमेदवारांनी मनसे आणि भाजपकडे उमेदवारीसाठी गर्दी केली होती. पक्षाचा प्रभाव पाहता नेत्यांनीही उमेदवारांकडून जातप्रमाणपत्र पडताळणी, पैसा खर्च करण्याची ऐपत, बंडखोरी करणार नाही, निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी शौचालय असल्याचे प्रमाणपत्र घेऊन पुढील अडचणीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. स्वगृही पक्षाकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे दिसताच अनेकांनी स्वत:चा पक्ष सोडून मनसेसारख्या पक्षाकडून उमेदवारी घेण्याच्या उचापती केल्याचे दिसून आले.