आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हुश्श... सुटलो बाबा’ उमेदवारांची.. अवस्था, 8 दिवसांच्या प्रचारानंतर मतदार बजावणार हक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -  हुश्श.. सुटलो बाबा.. आला एकदाचा मतदानाचा दिवस. असाच काहीचा सुटकेचा नि:श्वास गटा-गणातील उमेदवारांनी सोडला असल्याचे दिसून आले. त्याला कारणही तसेच आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे महालगाव येथे एका प्रचारसभेसाठी आले होते. तेव्हा एका उमेदवार म्हणाला, साहेब परेशान झालो, कधी १६ तारीख येते याची वाट पाहतोय; तेव्हा दानवेंनी  राजकारण हा घाणेरडा धंदा आहे, याच्या फंदात पडू नका, आपले वखर-नांगरच बरे, असा टोला उमेदवाराला उद्देशून लगावला होता. यावरून उमेदवार किती हैराण झाले होेते हे काही अंशी दिसून येते.   

गेल्या दहा दिवसांपासून गावागावांत प्रचाराचा धूमधडाका सुरू होता. प्रचाराच्या तोफा बुधवारी रात्री थंडावल्या. निवडणूक लढवायची म्हटले की पैसे अन् वलय पाहिजे. निवडणूक लढवणे हे आता सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सकाळी प्रचारासाठी निघताना जवळचे कार्यकर्ते- नातेवाईक व इतरांना सांभाळणे, त्यानंतर मतदारांसमोर हात जोडून मतांचा जोगवा मागणे आदी सर्वच गोष्टी ओघाने आल्याच. या गोष्टीमध्ये प्रचाराचे विविध साहित्य बॅनर- पोस्टर्स, स्टिकर, बॅच, पट्टी आदींसाठी होणार खर्च व इतर असा दिवसाकाठी सुमारे ३० ते ४० हजारा किमान खर्च लागतो. कमाल मर्यादा या खर्चाने केव्हाच अनेकांकडून ओलांडल्या आहेत. 

प्रचार बंद झाला की शेवटच्या दाेन दिवसांत केवळ पैशांच्या देवाणघेवाणीवर उमेदवारांना विश्वासू कार्यकर्त्यांमार्फत किंवा नातेवाइकांमार्फत खेळ करावा लागतो. मतदानाच्या शेवटच्या दिवशी केवळ माझ्याकडे इतके मतदान आहे, इतके पैसे द्या, असा तगादा लावणारे कार्यकर्ते उमेदवारांभोवती गावागावांत दिसून आले. एकूणच नोटाबंदी व कॅशलेसमुळे या निवडणुकांच्या खर्चात कोणतीही कपात होताना उमेदवारांमार्फत दिसली नाही. याचा परिणाम केवळ सामान्यांवर झालेलाच दिसून येत आहे.
 
रात्र वैऱ्याची, कार्यकर्त्यांची घालमेल
मतदानाच्या एक दिवस अाधी म्हणजेच काल रात्री गावागावांत कार्यकर्त्यांची नुसती घालमेल सुरू होती. कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठका अन् कार्यकर्त्यांना ढाब्यावर बसवण्याच्या धांदलीत अनेक जण दिसून आले. कोणत्या भागात किती मतदान आहे, आपल्याला किती मिळेल, कुणाकडे किती मतदान आहे, याला अमुक पैसे द्यावे लागणार अशी रणनीती रात्रभर बैठकांमधून सुरू होती, तर गावालगतच्या ढाब्यांना दिवाळीचे स्वरूप आले होते. दहा कार्यकर्त्यांमागे एक लीडर असायचा. ढाब्यावर गेले की दोन चिकन हंडी, ग्लास, पापडची ऑर्डर करतानाचे चित्र रात्रभर दिसून आले. 

खुलताबादेत आरोप-प्रत्यारोपाची पातळीही घसरली 
विधानसभा निवडणुकीदरम्यान एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराला पाच लाख घे अन् उमेदवारी मागे घे, असे सांगितले. त्यावर समोरचा उमेदवार म्हणाला, मागे घेतो पण पंचवीस लाख लागतील. यावर हो-नाही करत सौदा दहावर ठरला होता. मोबाइलवर संभाषण झालेल्या या ध्वनिफितीचा आवाज जाहीर सभेत वाजवत विरोधकांचे धिंडवडे एका पदाधिकाऱ्याने काढले. समोरच्या उमेदवाराची पत्नी निवडणुकीत उभी आहे, आता त्यांना मतदारांसमोर जाणे कठीण झाले आहे. यावर ज्याच्यावर आरोप झाले तो पदाधिकारी म्हणाला, त्याने कुठे पैसे दिले, केवळ साैदा केला. तो आमची काय इमानदारी काढतो, असा उलट प्रश्न मतदारांना करत मते मागण्यावर जोर दिला.
बातम्या आणखी आहेत...