आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांगोळीसह मतदारांचे तोंड गोड करून स्वागत, मराठवाड्यात 15 ठिकाणी बहिष्कार कायम! (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर: आदर्श मतदान केंद्राबाहेर रांगोळी काढून मतदारांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर साखर देऊन मतदारांचे तोंड गोड केले. हा उपक्रम प्रशासनाचा काबिले तारीफ ठरला. - Divya Marathi
लातूर: आदर्श मतदान केंद्राबाहेर रांगोळी काढून मतदारांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर साखर देऊन मतदारांचे तोंड गोड केले. हा उपक्रम प्रशासनाचा काबिले तारीफ ठरला.
औरंगाबाद - पिण्याचे पाणी, स्वतंत्र ग्रामपंचायत, घराची कागदपत्रे, रस्ते आदी कारणांमुळे मराठवाड्यातील १५ गावांनी गुरुवारी(दि.१६) जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला.
 
औरंगाबाद जिल्ह्यातील रघुनाथपूरवाडी (ता. वैजापूर), जळकीघाट (ता. सिल्लोड), कळंब तालुक्यातील खाेंदला, भूम तालुक्यातील माळेगाव, तुळजापूर तालुक्यातील धनेगाव आणि लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळीयासह नांदेड जिल्ह्यातील ५, बीड २ तर हिंगोली जिल्ह्यातील एका गावाचा यात समावेश आहे. या गावांमध्ये मतदान झाले नाही. या गावांतील मतदारांनी आपल्या हक्कावर ‘पाणी’ सोडले.
 
विस्थापितांना कागदपत्रे मिळेनात: तुळजापूर - १९९३ सालच्या प्रलयकारी भूकंपानंतर विस्थापित झालेल्यांना घराची कागदपत्रे देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील धनेगाव ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला. यामुळे दिवसभरात येथे एकाही मतदानाची नोंद झाली नाही.   

करवाडीतील आदिवासी ठाम: हिंगोली
कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील आदिवासी मतदारांनी विकासकामे होत नाहीत आणि मतदान केंद्र गावापासून केंद्र गावापासून ३ किमी नांदापूर येथे असल्यावरून मतदानावर बहिष्कार टाकला. गावात रस्ते, नाल्यासारखेही विकास कामे होत नाहीत असा आरोप त्यांनी केला. गावात सुमारे १७५ मतदार आहेत.
 
नागरी समस्या सुटता सुटेना
जळकीघाट : सिल्लोड तालुक्यातील जळकीघाट गावाचा विकास करण्यास असमर्थ असलेल्या प्रशासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून येथील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला.गुरुवारीदुपारी तीन वाजेपर्यंत पोलिस पाटील , आंगणवाडी सेविका, शिपाई असे तीन मतदान केंद्रावर झाले. 

रघुनाथपूरवाडी : वैजापूर तालुक्यातील रघुनाथपूरवाडी गावाला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची अवस्था गंभीर असून या प्रकरणाकडे अद्याप कोणत्याही लोकप्रतिनिधीने लक्ष दिले नाही. त्यामुळे वैजापूर तालुक्यातील रघुनाथपूरवाडीच्या सर्वच मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. 
 
रस्त्याअभावी मतदान नाकारले  
कळंब  : खोंदला येथे रस्ता न केल्यामुळे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला.  खोंदला पाटी ते गाव असा जवळपास ३ कि.मी.चा रस्ता पूर्ण उखडला आहे. हा रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे भविष्य काळात येथील बस बंद होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी  महिन्यात महाशिवरात्रीची यात्रा उश्रेश्वर पिंपरी (केज)  येथे भरते. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत महामंडळाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते ,पण रस्ता खड्ड्यात असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
 
पेयजल योजनेचे काम अर्धवट
माळेवाडी : भूम तालुक्यातील माळेवाडी येथे २०१४ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणी पुरवठ्यासाठी २९ लाख रुपये निधी मंजूर झाला. यातून काही कामे गुत्तेदाराकडून करण्यात आली. उर्वरित बाकी होती. यामुळे हे काम अपूर्ण झाले. अपूर्ण कामांमुळे पाणी आणि वीज असूनही येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. धरण उशाला, कोरड घशाला, अशी येथील अवस्था झाली आहे. लाखो रुपये खर्चूनही ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा प्रशासनाला दिला होता. 
 
लातूर : शेंद्री गावात केवळ १०० मतदार 
पाच ते सहा गावांमध्ये बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर ग्रामस्थांनी आपला बहिष्कार मागे घेऊन निवडणुकीत भाग घेतला. मात्र अहमदपूर तालुक्यातील शेंद्री गावातील बहिष्कार अखेरपर्यंत मागे घेण्यात आला नाही. तेथे १०० मतदार आहे.
 
बीड : दोन गावांचा बहिष्कार कायम
बीड तालुक्यातील आहेरवडगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी तर गेवराई तालुक्यात पांढरी येथे रस्त्यासाठी मतदारांनी दुपारी चार वाजेपर्यंत मतदान केले नव्हते.  बीड तालुक्यातील पाली सर्कलमधील आहेरवडगाव येथे गुरुवारी दलित वस्तीवरील मतदारांनी पाण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला.
 
दुपारी तीन वाजेपर्यंत दीडशेपैकी एकही मतदाराने मतदान केले नव्हते पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत असून जवळपास विहीर खोदण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. गेवराई तालुक्यातील पांढरी ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता. दुपारपर्यंत एकही मतदान झाले नव्हते.
 
पुढील स्‍लाइड्सवर वाचा..लातुर, जालना, हिंगोली, परभणीमधील स्थिती 
 
 
बातम्या आणखी आहेत...