आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद शाळेतील सर्व वर्ग एकाच सत्रात भरणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - येथील जिल्हा परिषद शाळेत सध्या दोन सत्रांत भरवण्यात येणारे माध्यमिक व प्राथमिक विभागाचे सर्व वर्ग लवकरच एकाच सत्रात भरवले जाणार आहेत. एकाच सत्रात शाळा भरवण्यासंबंधी वरिष्ठ कार्यालयाने मंजुरी दिल्यामुळे ही शाळा 18 नोव्हेंबरपासून साडेनऊ ते सायंकाळी 4 या वेळेत भरणार आहे.

जिल्हा परिषदेच्या वाळूज माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या शाळेला मागील तीन दशकांपासून पुरेशी इमारत नसल्याने ती दोन सत्रांत भरवली जात असे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळच्या सत्रात, तर इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग दुपारच्या सत्रात भरवण्यात येत होते. मात्र, पाच वर्षांपासून शालेय समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत सुमारे 90 लाख रुपयांचा निधी इमारतीसाठी मंजूर करण्यात आला. या निधीतून शाळेची सुसज्ज दुमजली इमारत आज नगर-औरंगाबाद महामार्गावर डौलात उभी आहे. मात्र, अनेकांनी बांधकामातील विविध त्रुटींबाबत शालेय समितीकडे तक्रारीही केल्या; परंतु त्या तक्रारींचे निरसन करण्याऐवजी शालेय व्यवस्थापन समितीने आरोप-प्रत्यारोप करून वेळ मारून नेली आहे. यातील अपवादात्मक त्रुटी वगळता आज ही इमारत गावाचे भूषण ठरत आहे. या इमारतीमुळे वर्गखोल्या मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे दोन सत्रांतील शाळा एकाच सत्रात सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शालेय शिक्षण समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
शाळेची मोठी वास्तू तयार झाली आहे. मात्र, तिची स्वच्छता करण्यावरून दोन्ही सत्रांतील शाळा व्यवस्थापन समितींमध्ये कायम धुसफूस सुरू होती. सरळ चाव्या न देण्यापर्यंत प्रकार घडत आहेत. समितीने 14 ऑक्टोबर रोजी तातडीने बैठक घेतली. मुख्याध्यापिका एस. ए. कुरुंदकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन्ही सत्रांतील शाळा 18 ऑक्टोबरपासून सकाळी साडेनऊ ते सायंकाळी चार या एकाच सत्रात भरवण्याचा ठराव मंजूर केला. मोजक्या शिक्षकांच्या विरोधाला न जुमानता हा ठराव बहुमताने मंजूर झाला. त्यामुळे वाळूजची शाळा आता 18 ऑक्टोबरपासून सकाळी साडेनऊ ते सायंकाळी चार अशा एकाच सत्रात भरवली जाणार आहे.

गंगापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी घोडके यांनी शालेय शिक्षण समिती पदाधिकार्‍यांच्या निर्णयाचे स्वागत क रून या ठरावाला मंजुरी दिल्याचे सांगितले. या वेळी शालेय शिक्षण समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.