आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प.च्या 22 शिक्षकांना नोटिसा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेतील वर्गखोली बांधकामासाठी उचललेल्या निधीचा वापर न केल्याप्रकरणी अवारी-गवारी वस्ती (ता. गंगापूर) येथील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक भानुदास चव्हाण यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल 22 शिक्षक, मुख्याध्यापकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

शिक्षणाधिकारी उपासनी यांनी शाळांना भेटी देण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी केलेल्या तपासणीत सेवानिवृत्त मुख्याध्यापक चव्हाण यांनी 2010-11 मध्ये वर्गखोली बांधण्यासाठी घेतलेल्या पाच लाख 93 हजारांच्या वाढीव निधीचा हिशेब सादर केला नसल्याचे स्पष्ट झाले. बांधकामासाठी हा निधी खर्च करावा, असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात बांधकाम झालेच नसल्याचे उपासनी यांना दिसून आले.

दोन ठिकाणी पदभार
माळीवडगाव (ता. गंगापूर) येथील मुख्याध्यापक धनवे यांची फुलशिवरा गावात बदली झाली. मात्र, त्यांनी माळीवडगाव शाळेचा कार्यभार दुसर्‍या मुख्याध्यापकाकडे दिलाच नाही. शिवाय फुलशिवरा येथे सर्व शिक्षा अभियानाचा तीन लाख रुपयांचा निधी उचलला आहे. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत खातेनिहाय चौकशी सुरू आहे.

22 जणांना नोटिसा
उपासनी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शिक्षकांना देता आली नाहीत. त्यामुळे त्यांनी दोन मुख्याध्यापकांसह 20 शिक्षकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.