आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईमुळे 400 रुपयांत दोन ड्रेस शिवून मिळेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद'- जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र महागाईच्या काळात दोन गणवेशाच्या शिलाईसाठी देऊ केलेले 400 रुपये कमी पडत आहेत. एवढ्या कमी किमतीत गावातील एकही टेलर गणवेश शिऊन देण्यास तयार नसल्याने मुख्याध्यापकांची पंचाईत झाली आहे. शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणा-या एक ते आठ वर्गातील मुली तसेच एस.सी., एस. टी. आणि बीपीएल संवर्गातील मुलांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यात येतात. त्यांच्या गणवेशासाठी पर गणवेश 200 रुपये याप्रमाणे दोन गणवेशासाठी 400 रुपये मंजूर करण्यात आले आहे.
शाळा स्तरावर त्याचा निधीही पोहोचला आहे.
मात्र शंभर रुपयांत गणवेशाचे कापड मिळत नसून शंभर रुपयांत कुणीही गणवेश शिऊन देण्यास तयार होईना. त्यामुळे कपडे घेणे आणि शिवून देणे मुख्याध्यापकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. गावातील टेलर 150 रुपये प्रती ड्रेस प्रमाणे शिवून देण्यास तयार आहे. मात्र शासनाचा दर कमी असल्याने मुख्याध्यापकांना पैसे असूनही गणवेश शिवून देणे अशक्य झाले आहे. जिल्ह्यात एक लाख 61 हजार 218 मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी सहा कोटी 44 लाख 87 हजार 200 रुपये देण्यात आले आहेत. शासनाने एका विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी 500 रुपये प्रमाणे आठ कोटी सहा लाख नऊ हजार रुपये देण्याची मागणी होत आहे. याबाबत शिक्षणाधिका-यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.