आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, छुप्या प्रचारावर प्रशासनाची करडी नजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी  सुरू असलेला प्रचार मंगळवारी सायंकाळी थंडावला. गुरुवारी होत असलेल्या मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून शांततेत व निर्भय वातावरणात लोकशाहीची प्रक्रिया पार पडण्यासाठी प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. मराठवाड्यात प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुरंगी लढतीचे चित्र आहे. त्यामुळे निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
 
लातूर: 1491 केंद्रांवर मतदान
जिल्ह्यातील १४९१ केंद्रांवर मतदान होणार असून ३२४२ पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे गैरप्रकाराला आळा बसणार आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत आघाडी करून तर भाजप, शिवसेना वेगवेगळे होऊन मतदारांना सामोरे गेले. त्यामुळे काही ठिकाणी तिरंगी तर कुठे दुरंगी लढती झाल्या. सर्वच बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले होते. खास करून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार दिलीपराव देशमुख व अमित देशमुख यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला. सर्वच उमेदवारांनी रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षणावर आपल्या भाषणात भर दिला होता. लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ५८ गट तर पंचायत समितीचे ११६ गण आहेत. मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, याचा फैसला २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.  

निवडणुकीसाठी १३ लाख ६ हजार २२९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात १४९१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सर्वात जास्त मतदान केंद्रे निलंगा तालुक्यात २४० तर सर्वांत कमी शिरूर अनंतपाळ तालुक्यात ६६ मतदान केंद्रे असतील. मतदान प्रक्रियेसाठी सात हजार १०० मतदान अधिकारी, एक हजार ६७० मतदान केंद्र अध्यक्ष, १६० क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी एकूण १० हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी, कर्मचारी बुधवारी सायंकाळपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर दाखल हाेणार आहेत.  अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने १९ फ्लाइंग स्कॉड, २४ व्हिडिओ पथक आणि २४ चेकपोस्ट कार्यरत ठेवले आहेत. बहुतांश मतदान केंद्र शाळांमध्ये आहेत. बंदोबस्तासाठी ३२४२ पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, १३ पोलिस उपअधीक्षक, २३ पोलिस निरीक्षक, ९५ सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, २०३६ पोलिस, ६४१ होमगार्ड, १२६ जवानांचा सहभाग असलेली एक एसआरपीची तुकडी तैनात करण्यात आली आहे. ३०३ पोलिस बाहेरील जिल्ह्यातून मागवण्यात आले आहेत.  या मुळे कुठलाही गैरप्रकार होणार नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 
 
बीड: दिग्गजांची प्रतिष्ठा लागली पणाला  
कुटुंबातील उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. माजलगाव तालुक्यातील गंगामसला गटातून राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगला सोळंके, तेलगाव गटातून पुतणे जयसिंह सोळंके लढत आहेत. तर पात्रूड जिल्हा परिषद गटातून भाजपचे आमदार आर.टी.देशमुख यांचे पुत्र रोहित देशमुख निवडणूक रिंगणात आहेत. आष्टीचे राष्ट्रवादीचे  माजी मंत्री सुरेश धस यांच्या पत्नी संगीता या मुर्शदपूर गटातून लढत असून  नेकनूर जिल्हा परिषद गटातून भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या पत्नी सारिका लढत आहेत.  काकू-नाना विकास आघाडीकडून नवगण राजुरी गटातून सभापती संदीप क्षीरसागर तर बहिरवाडी गटातून त्यांच्या मातोश्री रेखाताई क्षीरसागर लढत आहेत. गेवराई तालुक्यातील चकलंबा गटातून विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, तर उमापूर गटातून माजी मंत्री  बदामराव पंडित यांचे पुत्र युधाजित लढत आहेत. परळी तालुक्यात रामेश्वर मुंडेविरुद्ध अजय मुंडे असा मुंडे बंधूचा सामना रंगत आहे. तर युसूफवडगाव गटात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना आडसकर लढत आहेत. 

१५ लाख मतदार हक्क बजावणार   
१५ लाख ५१ हजार मतदार हक्क बजावणार आहेत. बीड जिल्ह्यातील ६० जिल्हा परिषद गटात ३३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. तर पंचायत समितीच्या १२२ गणांसाठी ५७७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेसाठी जिल्ह्यात १८६६ मतदान केंद्र असून त्या पैकी १५१ केंद्र संवेदनशील आहेत.
 
नांदेड : उमेदवार गाठी-भेटी घेण्यात मग्न
 जिल्ह्यातील १६ तालुक्यांत गुरुवार, १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ६३ जिल्हा परिषद गटांसाठी ३७४ व १२६ पंचायत समिती गणांसाठी ६०३ उमेदवार निवडणूक लढवणार अाहेत. या निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंडावल्या. त्यामुळे आता उमेदवार मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यात मग्न आहेत.
  
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यांच्यासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. सुरुवातीला जिल्हा परिषद गटातील निवडणूक रिंगणातील उमेदवारांची तालुकानिहाय संख्या (कंसात पंचायत समिती गणासाठी उमेदवारांची संख्या) माहूर- १० (२४)  , किनवट-  ४८ (७३), हिमायतनगर –  १३ (१६). हदगाव- ४५ (५४), अर्धापूर- १२ (२०) , नांदेड- ३४ (४३), मुदखेड- ७ (१७) , भोकर- १६ (३१) , उमरी- ९ (२२), धर्माबाद- १२ (२०), बिलोली- २६ (३६), नायगाव- २१ (३९) , लोहा- २८ (५७), कंधार-  २९ (५६), मुखेड- ३३ (५६) , देगलूर- ३१ (३९) असे एकूण जिल्हा परिषद गटांसाठी ३७४ व पंचायत समिती गणांसाठी ६०३ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...