आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना जिल्ह्यातील 14 रुग्णालयांत त्रुटी; रुग्णालये बंदची होऊ शकते कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना -  बॉम्बे नर्सिंग होम कायद्यांतर्गत जालना जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची धडक तपासणी मोहीम राबवण्यात आली. आरोग्य विभागातील अठरा जणांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने ३५० रुग्णालयांची तपासणी केली. यात १४ रुग्णालयांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्याने त्यांना नोटिसा दिल्या आहेत.

 

त्रुटींची पूर्तता न करणारी रुग्णालये बंद करण्याची तसेच फौजदारी गुन्हे दाखल होण्याची  शक्यता आहे. यामुळे सध्या तरी या रुग्णालयांवर फौजदारी कारवाईची टांगती तलवार आहे.  
 जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने जिल्ह्यातील ३५० रुग्णालयांची तपासणी केली. यात ६७ सोनोग्राफी सेंटर, ४४ गर्भपात केंद्रांसह इतर अशा एकूण ३५० रुग्णालयांची धडक तपासणी मोहीम राबवली.  या तपासणी मोहिमेत जिल्ह्यातील १४ रुग्णालये दोषी आढळली आहेत.

 

या रुग्णालय चालक डॉक्टरांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्यांच्यावर अजून कडक कारवाई केली जाणार आहे. त्रुटी आढळून आलेल्या रुग्णालयांना नोटिसा देऊन पूर्तता करण्याबाबत कळवण्यात आले असून त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या रुग्णालयांवर फौजदारी गुन्ह्याबरोबरच दंडात्मक कारवाई  करण्यात येणार असल्याचेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी सांगितले.

 

या रुग्णालयांत त्रुटी
डॉ. आर. भाला, भाला हॉस्पिटल, अंबड, डॉ. बिश्वास, धन्वंतरी हॉस्पिटल अंबड, डॉ. मनीष जायभाये, डॉ. जयस्वाल, डॉ. लखमले, डॉ. धाबेकर, डॉ. वाघमारे, डॉ. गिराम, डॉ. दहीकर आय हॉस्पिटल अंबड, डॉ. हडवाल, रुबी हॉस्पिटल परतूर, डॉ. उढाण   हॉस्पिटल परतूर, डॉ. मोहसीन खान लाइफ हॉस्पिटल भोकरदन, डॉ. नसीम खान खुशी हॉस्पिटल, डॉ. काबरा काबरा हॉस्पिटल, भोकरदन या डॉक्टरांच्या रुग्णालयांचा समावेश आहे.  


या होत्या त्रुटी  
तपासणीत रुग्णालयांची नोंदणी नसणे, पुनर्नोंदणी न करणे,  रुग्णालयांमध्ये नोंदणीकृत संख्येपेक्षा जास्त खाटा, प्रशिक्षित परिचारिका नसणे, बायो मेडिकल वेस्ट अंतर्गत नोंदणी नाही, प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत नोंदणी नाही, तज्ज्ञ डॉक्टरांच्या नावाचे फलक रुग्णालयात मात्र, प्रत्यक्षरीत्या त्या रुग्णालयास भेट न देणे आदी प्रकारच्या त्रुटी धडक तपासणी मोहिमेंतर्गत पथकाला आढळून आल्या आहेत. 

 

नोटिसा बजावल्या

त्रुटी आढळून आलेल्या रुग्णालयांना नोटिसा दिल्या आहेत. त्रुट्यांची पूर्तता न केल्यास  त्यांना फौजदारी कारवाईलाही सामोरे जावे लागेल. किंवा नर्सिंग कायद्यांतर्गत ही रुग्णालये बंदही केली जाऊ शकतात.  - डॉ. एम. के. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, जालना

बातम्या आणखी आहेत...