आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन/सोयगाव देवी - अस्वलाने तीन जणांना चावा घेत गंभीर जखमी केल्याची घटना धनगरवाडी, फत्तेपूर येथे मंगळवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. अस्वलाला पकडण्यासाठी भोकरदन, जाफराबाद, जालना व अजिंठा येथील १२ जणांचे पथक जाळीसह तैनात करण्यात आले आहेत.
अस्वलाचा हल्ला झाल्याची बातमी पसरताच गारखेडा देवी, लिंगेवाडी, जोमाळा, फत्तेपूर, मासनपूर आदी सात गावांतील शेतकरी अर्धवट कामे सोडून गावाकडे परतले. दरम्यान, भोकरदनपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील वनक्षेत्रातून अस्वल आले असण्याचा प्राथमिक अंदाज वनपाल दोडके यांनी व्यक्त केला आहे.
धनगरवाडी येथील आकाश अशोक सपकाळ या युवकाला अस्वलाने जखमी केले. यानंतर फत्तेपूर येथे ज्वारीची सोंगणी करीत असलेल्या रुख्मण सारंगधर तळेकर (४५) या महिलेला चावा घेतला. काही वेळानंतर फत्तेपूर येथील शुभम संजय गायकवाड या मुलावरही अस्वलाने हल्ला केला. यातील जखमींना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अस्वल अजूनही गायब
अस्वल अजूनही वन विभागाला पकडता न आल्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अस्वल नेमके पिसाळलेले आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उन्हाळ्यामुळे अनेक शेतकरी शेतात झोपण्यासाठी जातात.
८० ते ९० युवक गावपातळीवर तैनात
अस्वलाच्या हल्ल्याची बातमी पसरताच सात गावांतील शेतकरी शेतातील अर्धवट कामे सोडून गावात आले. गावातही या अस्वलाकडून हल्ला होऊ नये म्हणून जोमाळा, फत्तेपूर येथील युवकांनी हातात काठ्या घेऊन ८० ते ९० युवकांचे गट करू न अस्वलाला पकडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
अस्वलाला दगडांचा मारा
आकाश सपकाळ हा शेताकडून येत असताना अचानक अस्वलाच्या हल्ल्यामुळे हा युवक जोरजोराने ओरडत होता. अस्वलाच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी आकाश हा एका हाताने अस्वलाला दगडांचा मारा देत होता. परंतु, अस्वलाने अधिक तीव्रतेने चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. आवाजाने या परिसरातील नागरिक बाहेर येत असल्याची गर्दी पाहून अस्वलाने तेथून पळ काढला. यानंतर आकाशला भोकरदन येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.