आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत 9.76 लाखांचे 8 टन 135 किलो मांस जप्त; तिघे पोलीसांच्‍या ताब्‍यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- नगरपालिकेने एका वर्षापूर्वी ठराव घेऊनही शहरात १४ बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी (दि. २५) रात्री नगरपालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून नऊ लाख ७६  हजार २०० रुपयांचे  ८ टन १३५ किलो मांस पकडले. इतक्या मोठ्याप्रमाणात मांस हस्तगत करण्याची ही पहिलीच वेळ असून यापूर्वीही कारवाया करण्यात आल्या आहेत.   


बेकायदेशीर कत्तलखान्यांच्या विरोधात शासनाने कारवाई करण्याचे थेट आदेश दिले आहेत. तसेच नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर सुमारे वर्षभरापूर्वी पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेले कत्तलखाने बंद करण्याचा ठरावही घेण्यात आला आहे. 
तरीही नगरपालिका प्रशासन व पोलिसांना कत्तलखाने पूर्णपणे बंद करण्यात अद्यापही यश आलेले नाही.   शहरातील खिरणीमळा भागात कत्तलखान्यात जनावरे कापणे सुरू असल्याचे नगरपालिकेचे अधिकारी व पोलिसांना समजले. यामुळे रात्री आठ वाजेच्या सुमारास नगरपालिकेचे अधिकारी तसेच सुमारे ३० कर्मचाऱ्यांच्या पोलिस पथकाने छापा टाकला. तेथे कोकणजी मुजीब कुरेशी याच्या पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलखाना सुरू असल्याचे आढळले. 

 

पोलिस दिसताच तिघांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी  सर्वांना पकडले. यामध्ये कोकणजी याच्यासह (४५), बशीर खुदबोद्दीन कुरेशी (५२, दाेघे रा. खिरणीमळा) व दत्ता राजेंद्र गोवेकर (३५, भातंब्रा, ता. बार्शी) यांना पकडण्यात आले. मांसाची मोजणी केली  असता ते आठ टन १३५ किलो भरले. याची बाजारातील किंमत ९ लाख ७६ हजार २०० रुपये आहे. 
इतक्या मोठ्या प्रमाणात मांस पाहून पोलिस व नगरपालिकेचे कर्मचारीही अचंबित झाले. नगरपालिकेचे स्वच्छताप्रमुख विलास गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

 

साडेसात तास कारवाई   
नगरपालिका व पोलिसांच्या पथकाने रात्री आठ वाजता छापा मारला होता. मांसाची मोजदाद करून कारवाई करून गुन्हा दाखल करण्यासाठी मध्यरात्री ११.५८ पर्यंतचा कालावधी गेला. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक सुनिल कांबळे, विलास गोरे, आकाश शिंगाडे, महादेव माने, राम वाघमारे, उल्हास झेंडे, संदिपान वाळवे, कस्तूर गायकवाड यांनी कचरा डेपोत पहाटे ३.३० वाजेपर्यंत मांस नष्ट केले.   

 

 

दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
बेकायदेशीर कत्तलखान्यामुळे खिरणीमळा, बौद्धनगर व परिसरातील भाग प्रदूषित झाला आहे. अक्षरश: उघड्यावर जनावरांची कत्तल केली जात आहे. नालीतून रक्ताचे पाट वाहत असतात. कुजलेले मांस व हाडे उघड्यावरच असतात. यामुळे जीवघेणी दुर्गंधी या परिसरात पसरत असते.    

 

कारवाई करणार   
बेकायदा कत्तलखाने बंद व्हावेत यासाठीच जीबीत ठराव घेतला. यासाठी पोलिस व प्रदूषण मंडळानेही लक्ष देण्याची गरज आहे.   
- मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष.

बातम्या आणखी आहेत...