आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नद्यांवर पूल बांधण्यासह राज्यातील सर्व रेल्वेमार्ग फाटकमुक्त करणार! - चंद्रकांत पाटील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- राज्यातील सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्याबरोबरच अत्यावश्यक नद्यांवरील पुलांच्या सर्वेक्षणानंतर पूल बांधकामाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील रेल्वेमार्ग फाटक मुक्त करण्यावरही राज्य सरकारचा भर राहील, अशी ग्वाही राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली. जिल्ह्यातील १७ कोटी रुपयांतून बांधण्यात येणाऱ्या पिंगळी-ताडलिमला-वझूर -मरडसगाव या रस्त्यावरील गोदावरी नदीवरील पुलाच्या बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.गंगाधरराव पवार हे होते. भाजप प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आ. मोहन फड, आ. डाॅ.मधुसूदन केंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला राठोड, कुलगुरू डॉ.अशोक ढवण आदी उपस्थित होते. 


पाटील म्हणाले की, राज्यात राबवलेल्या जलयुक्त शिवारमुळे जमिनीतल्या पाण्याचा साठा वाढला आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्यात येत आहे. यामुळे टंचाई काळात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्या कमी होत चालली आहे. त्यातच सर्व रेल्वे फाटकांवर पूल असण्याची गरज आहे. राज्यात फाटक मुक्त महाराष्ट्र हे अभियान राबवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व रेल्वे फाटकांजवळ पूल बांधून वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. 


येत्या दीड वर्षात राज्यातील व तीन वर्षांत राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते पूर्ण होतील, असे नियोजन केले आहे. अडचणीच्या ठिकाणी अावश्यक असलेल्या नदीवरील पुलांच्या सर्वेक्षणाचे काम विभागाने हाती घेतले आहे. अशा सर्व पुलांची कामे शासन प्राधान्याने पूर्ण करणार आहे, असेही ते म्हणाले. 


पाटलांचे मानले लोणीकरणांनी आभार 
लोणीकर यांनी अनेक वर्षापासूनच्या गोदावरी नदीवरील पुलाच्या मागणीकडे लक्ष देऊन त्याची सुरुवात केल्याबद्दल पाटील यांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले, जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी केंद्राने ७ हजार कोटी रुपयांचा निधी दिला. राज्य सरकारनेही रस्त्यांसाठी व पुलासाठी भरीव निधी दिला. १०६ कोटी रुपयांचा पीक विमा जिल्ह्याला मंजूर झाला आहे. विमा कंपनी समवेत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नुकसानग्रस्त वगळलेल्या गावांबाबत आढावा घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. 


तर खा. दानवे म्हणाले की, ३३ टक्के नुकसान झाले तरी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेऊन या सरकारने ब्रिटिश काळातील पिकांची आणेवारी काढण्याची पद्धती बदलली असल्याचे सांगितले. 


ॲड. पवार यांनी अध्यक्षीय भाषणात गोदावरी नदीवरील पूल मंजूर केल्याबद्दल आभार मानून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या पुढाकाराने परभणी जिल्ह्यात रेशीम अंडीपूंज निर्मिती केंद्र सुरु करावे, अशी मागणी केली. प्रास्तविक ॲड.रमेश गोळेगावकर यांनी केले. डॉ.सुभाष कदम यांनीही पीक विमा योजने संबंधी प्रश्न मांडले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, सीईआे पृथ्वीराज बी.पी., सा.बां.चे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, संतोष शेलार यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 


खड्ड्यांतून काढावा लागला मार्ग 
खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांच्यासह नेते मंडळींना लिमला ते वझूर या मार्गावरून जाताना अत्यंत खड्ड्यांतून मार्गक्रमण करावे लागले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या मार्गावर अधिक दलदल झाली होती. काही ठिकाणी मुरूम टाकला गेला तरी खड्डे कायम होते. 

बातम्या आणखी आहेत...