आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत वृद्धेचा मृत्यू पाहवला नाही, पुनरावृत्ती होऊ नये म्हणून 20 सेवानिवृत्तांनी सुरू केले अन्नछत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- परदेशी राहणाऱ्या मुलाच्या वृद्ध आईचा मुंबईत सांभाळ करण्यासाठी कोणीच नसल्याने अन्नाचून मृत्यू झाल्याची घटना बीडच्या सेवानिवृत्त बँक अधिकारी कर्मचाऱ्यांनी  टीव्हीवर पाहिली.  या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर  परिणाम झाला आणि  अशा घटनांची  पुनरावृत्ती होऊ नये म्हणून २० सेवानिवृत्त  बँक  कर्मचाऱ्यांनी रोटरी क्लबच्या सहकार्याने बीड शहरातील परवानानगरातील दत्त प्रसादालयाच्या माध्यमातून निराधार, वयोवृध्द व अपंग अशा ५० जणांना  घरपोच मोफत दोन वेळचा  डबा देण्याचा उपक्रम हाती घेतला. सेवानिवृत्तांनी ही सामाजिक बांधिलकी जपत एक वेगळा आदर्श समोर  ठेवला आहे.


 परवानानगरात दोन एकरवर  स्टेट बँक कॉलनी असून येथे सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची १६ कुटुंबे राहतात. १९८५ मध्ये याच सेवानिवृत्तांनी एकत्र येत एक लाख रुपये गोळा करून  सुंदर दत्त मंदिर बांधले. आयुष्यातील सेकंड इनिंग मौज मजेत घालवण्यापेक्षा सामाजासाठी काही तरी केले पाहिजे या उदात्त हेतूने त्यांनी शहरातील  भुकेल्या, निराधार, अपंग व वयोवृध्दांना दोन वेळचा मोफत डबा पुरवण्यासाठी लोकसहभागातून अन्नछत्र सुरू करण्यासाठी शहरात सर्व्हे  केला. यातून पहिल्यांदा ५० नावे पुढे आली तेव्हा  शहरातील दानशुरांच्या उपस्थितीत २५ जानेवारी २०१८ रोजी या अन्नछत्रास सुरुवात झाली.


स्वयंपाकाची भांडी व अन्नधान्य बीडमधील दानशुर लोक देत आहेत. या कॉलनीतील श्रीमती अंबुरेयांच्यासह इतर महिलांनी  स्वयंपाकासाठी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेतला. कोणतेही मानधन न घेता त्या  आनंदाने स्वयंपाक करत अन्नछत्राला साथ देत आहेत. खासगी सुरक्षा रक्षक असलेले दिलीप जोशी शहरात सायकलवर फिरून विविध ठिकाणी ५० निराधारांना घरपोच दोन वेळाचा डबा देत   सेेवेचा वाटा उचलत आहेत. पोळी, भाजी, भात असा या अन्नछत्राचा मेनू असतो. कॉलनीतील दत्त मंदिरात दररोज दुपारी १२ वाजता  सामुदायिक आरतीनंतर निराधारांसाठी दत्त प्रसाद म्हणून डबे पाठवले जाताहेत.

 

यांनी संकल्पना मांडली
मुंबईतील एका विधवेचा  मुलगा परेदशात राहतो.  वृध्दपकाळात त्याच्या आईचा  कोणीच सांभाळायला नसल्याने एकेदिवशी अन्नवाचून  तिचा तडफडून मृत्यू झाला. दीड वर्षाने  जेव्हा मुलगा घरी परतला तेव्हा आईच्या शरीराचा सांगाडा मुलाला दिसला. ही घटना टीव्हीवर पाहून  बीड येथील रोटरी क्लबचे माजी असिस्टंट गव्हर्नर गिरीष क्षीरसागर, शिवशंकर कोरे  यांचे हृदय हेलावले. या घटनेची पुनरावृत्ती बीडमध्ये होऊ नये म्हणून त्यांनी  अन्नछत्रांची  संकल्पना   मांडली.    


बीडकरांनी  साथ द्यावी
दत्त प्रसादालयातून मिळालेले अन्न सेवन केल्यांनतर त्यांच्या चेहऱ्यावरील जे समाधान आहे ते समाधान पाहूनच आम्हाला खरा आनंद मिळत आहे. हे अन्नछत्र अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी बीडकरांच्या मदतीची गरज आहे.
- शिवशंकर काेरे, सेवानिवृत्त बँक कर्मचारी ,बीड

बातम्या आणखी आहेत...