आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाममंत्र्यांचा रस्ते खड्डेमुक्त करण्याचा दावा फोल; मराठवाड्यातील परिस्थिती कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. मात्र त्यांचा दावा फोल ठरला. कारण बांधकाम विभागाकडून कासवगतीने खड्डे बुजवण्याची कामे सुरू आहेत. मराठवाड्यातील बीड, जालना, लातूर, औरंगाबाद, हिंगोली जिल्ह्यांतील रस्त्यांवर खड्डे अजूनही कायम आहेत. 

 

नांदेड- खड्डे बुजवण्याचे काम पूर्णत्वाकडे !

शहराजवळून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील ९८ टक्के तर जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम जवळपास ७० टक्के झाले असून हे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांनी दिली. दरम्यान, परभणी जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या लोहा ते पालम या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

 

हिंगोली- राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त; राज्य महामार्ग खड्डेयुक्त

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग बऱ्यापैकी खड्डेमुक्त झाले. तर जिल्हा व राज्य महामार्ग आजही खड्डेयुक्त अशीच आहे. तसेच अंतर्गत छोट्या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. जिल्ह्यात २२२ व १६१ क्रमांकाचे २ राष्ट्रीय महामार्ग आहेत. याच महामार्गांचे दोन उपमार्गही आहेत.या रस्त्यांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले असले तरी कामाला गती नसल्याने हे मार्ग पूर्णतः खड्डेमुक्त झाले नाहीत.

 

बीड- सार्वजनिक बांधकाम विभागाची कासवगती

जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील १०३ किलोमीटर अंतरावर खड्डे बुजवण्यात आले आहेत ज्याची टक्केवारी ७८ टक्के आहे, तर जिल्हाप्रमुख मार्गांवर ही स्थिती वाईट असून अवघ्या ५० किलोमीटर  अंतरावर खड्डे बुजवण्यात आले आहेत, ज्याची टक्केवारी ४३ टक्के असल्याची माहिती उपविभागीय अभियंता आर. आय. सय्यद यांनी दिली.

 

परभणी - परभणीत राष्ट्रीय महामार्गही खड्डेमय

 जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची दैनावस्था अद्यापही संपलेली नाही. खड्डेमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्याऐवजी खड्डेयुक्तच्याच दिशेने प्रवास करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग देखील याला अपवाद ठरलेला नसल्याने राज्य मार्गांची तर अवस्था विचारणेच नको, अशी स्थिती आहे. परभणी ते गंगाखेड हा ४० किलोमीटरचा रस्ता तर संपूर्ण राज्यात खड्डेमय म्हणून ओळखला जातो.

 

जालना- जालना जिल्ह्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवलेच नाहीत

अजूनही जिल्ह्यातील राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गावर खड्डे तसेच आहेत, तर राज्य मार्गावरील ८० टक्के अाणि जिल्हा मार्गावरील ६० टक्के खड्डे बुजविल्याचा दावा बांधकाम विभागाकडून केला जातो आहे.   जिल्ह्यात १२ राज्य मार्ग असून त्यांची लांबी २५० किमी आहे तर ६० प्रमुख जिल्हा मार्ग असून त्यांची जिल्ह्यातील लांबी ७०० किमी आहे. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

 

लातूर- रस्त्यांवर खड्डे; मंत्र्यांकडून अभिनंदनाचे ट्विट

 लातूर जिल्ह्यातील राज्य मार्गांवरचे खड्डे तसेच असतानाही अधिकाऱ्यांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर चकचकीत सादरीकरण केले. त्यामुळे भारावलेल्या मंत्र्यांनी लातूरच्या अधिकाऱ्यांचे ट्विट करून अभिनंदन केले. थेट मंत्र्यांनीच जाहीरपणे कौतुक केल्यामुळे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी खड्डे बुजवण्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

 

उस्मानाबाद- अनेक भागांत खड्डे कायम, काही खड्डे बुजवणे सुरू

जिल्ह्याच्या अनेक भागांत खड्डे कायम असून, काही खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. उस्मानाबाद शहरातही मोठ्या प्रमाणावर खड्डे कायम आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या बार्शी रस्त्यावर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ते जिजाऊ चौक रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांच्या दुरूस्तीसाठी बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...