आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांपूर्वी होती पोटाची भ्रांत, कोथिंबीर क्रांतीने भंडारीत आता 50 शेतकरी झाले लखपती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- दहा वर्षांपूर्वी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या गावात आज ५० हून अधिक लखपती शेतकरी आहेत. कोथिंबीर लागवडीच्या क्रांतीतून गावात समृद्धी आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील  २५०० लोकसंख्येच्या भंडारी गावाचे संपूर्ण अर्थकारणच कोथिंबिरीवर फिरते आहे. काही दिवसांपूर्वी बेकार फिरणाऱ्या अनेकांना लखपती बनवून कोथिंबिरीने अल्प खर्चात मुबलक उत्पन्नाचा  गुरुमंत्र गावकऱ्यांना दिला आहे. खास कोथिंबिरीच्या वाहतुकीसाठी गावकऱ्यांनी सुमारे ३५  टेम्पो घेऊन उन्नती साधली आहे.  

 

भंडारीमध्ये १२०० शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकरी कुटंुबात कोथिंबिरीचे उत्पन्न हमखास घेतले जाते. मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले तरी दरावर फार परिणाम होत नाही. आता गावातच व्यापारी तयार झाल्यामुळे बांधावर उभे राहून सौदा होतो. काढणीचा खर्चही व्यापारीच करतात. काढणीपूर्वीच पैसेही मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी कोथिंबीर खऱ्या अर्थाने संजीवनी ठरली आहे.  

 

यंदा ५० हजार ते दीड लाख रुपये एकर भाव
- बाजारात कोथिंबिरीच्या दराचा चढ-उतार लक्षात घेऊन व्यापारी कोथिंबिरीचा दर ठरवितात. पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांच्या दरम्यान कोथिंबीर काढणीला येते. एकरवर हा दर ठरतो. यावर्षी ५० हजार ते दीड लाख रुपये एकर भाव मिळाल्याचे, प्रदीप पाटील यांनी सांगितले. पाटील यांच्याकडे सर्वाधिक म्हणजे १० एकर कोथिंबीर आहे. त्यांच्याकडे स्वत:चे तीन  टेम्पो आहेत. ते व्यापारही करतात. 

 

 

- टेलरिंगचा व्यवसाय करणारे कनगरा (ता.उस्मानाबाद) येथील मुकेश राऊतराव या वर्षीपासून व्यापारी म्हणून कोथिंबिरीच्या व्यवसायात उतरले आहेत. ते म्हणाले, स्वत:च्या टेम्पोतून मंुबईला कोथिंबीर विक्री करून यावर्षी ४ लाख रुपयांचा नफा झाला आहे. भंडारीचे बाबासाहेब जाधव यांनी कोथिंबिरीतून दोन टेम्पो, एक एसयूव्ही खरेदी केली आहे.

 

मुंबई व्यापाऱ्यांनी बदलला इतिहास
१० वर्षांपूर्वीपर्यंत निसर्गाच्या बेभरवशामुळे भंडारीचे शेतकरी हवालदिल होते. जवळच्या कामेगाव, कास्ती  गावातून दोन छोटे टेम्पो  मुंबईच्या बाजारात पालेभाज्या नेत. भंडारीतील काही शेतकऱ्यांनी कोथिंबिरीची पेरणी केली. या टेम्पोतूनच कोथिंबीर मंुबईला पाठविली. कोथिंबिरीची गुणवत्ता आणि मागणी लक्षात घेऊन मंुबईच्या काही व्यापाऱ्यांनी भंडारी गाठले. त्यांनी शेतकऱ्यांना कोथिंबिरीचे उत्पादन घेण्यास उद्युक्त केले. हळूहळू उत्पादन वाढत गेले. गावातील टेम्पोचालकांनीच पुढे व्यापारीपणाचे धोरण अवलंबले. गावातून कोथिंबिरीचे फड विकत घेऊन त्याच्या जुड्या मुंबईच्या बाजारात जाऊ लागल्या. जुलै ते ऑक्टोबरपर्यंत काेथिंबिरीचे उत्पन्न टप्प्याटप्प्याने घेतले जाते. काही शेतकरी बारमाही हे पीक घेतात.  

 

> कोथिंबिरीचे अर्थशास्त्र 

खर्च : १ एकर कोथिंबीर उत्पादनास १० ते १२ हजार रुपये
-१५ किलो धणे (दर २५० रुपये किलो)
- एक पोते खत {पेरणीचा खर्च ५०० रुपये 
- एक वेळची खुरपणी ३ हजार रुपये
किमान ५० हजार रुपयांपेक्षा अधिक दरानेच एकरभर कोथिंबिरीला भाव मिळतो. कोथिंबिरीमुळे प्रत्येक दोन एकर 
शेती असणारा शेतकरी लखपती झाला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...