आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरमध्ये कोचिंग क्लास संचालकाची गोळ्या झाडून हत्या, अविनाश चव्हाण यांचा जागीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लातूरमधील 'स्टेप बाय स्टेप' या कोचिंग क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण (३२) यांचा रविवारी मध्यरात्री गाेळी घालून खून करण्यात आला. शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या शिवाजी शाळा परिसरात ही थरारक घटना घडली. चव्हाण हे राजकारणातही सक्रिय हाेते. मनसेचे लातूर जिल्हा विद्यार्थी अाघाडीप्रमुख म्हणून ते काम पाहत हाेते. तसेच काेचिंग क्लासेसच्या व्यवसायातही त्यांचा जम बसला हाेता. याच व्यावसायिक स्पर्धेतून त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे. दरम्यान, अाराेपींच्या तपासासाठी पाच पथके नेमण्यात आली असून ठोस धागेदोरे हाती लागल्याचा दावा पोलिस अधीक्षकांनी केला अाहे. 


शार्प शूटरने गाडीजवळ येऊन घातली गाेळी 
चव्हाण यांची व्यावसायिक स्पर्धेतून हत्या झाल्याचा संशय अाहे. शार्प शूटरकडून त्यांची हत्या घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस अधीक्षकांनीही त्याला दुजोरा दिला. मारेकऱ्यांनी रविवारी रात्री पाळत ठेवून त्यांची गाडी अडवली. बंद काचेमधून जवळून गोळी झाडली. ती थेट छातीत घुसली आणि चव्हाण यांचा जागेवरच मृत्यू झाला. यानंतर चव्हाण यांची कार रस्त्याच्या कडेला जाऊन बंद पडली. 


क्लासचा शुभारंभ हाेण्यापूर्वीच संपवले 
अविनाश चव्हाण यांचा लातूरमध्ये काेचिंग क्लासेसचा व्यवसाय हाेता. अाता ते नांदेडमध्येही शाखा सुरू करणार हाेते. साेमवारी त्याचा शुभारंभही हाेता. या कार्यक्रमाची पूर्वतयारी करून चव्हाण रविवारी मध्यरात्री लातूरला घरी परतत हाेते. मात्र साेमवारचा कार्यक्रम हाेण्याअाधीच त्यांना अतिशय क्रूरपणे संपवण्यात अाले. 


प्रतिस्पर्धी क्लासेस चालकावर संशय 
मृत अविनाश चव्हाण यांच्या मावसभावाने पाेलिसात दिलेल्या फिर्यादीत तीन जणांवर संशय व्यक्त केला अाहे. त्यात दाेन राजकारणी व एका अन्य काेचिंग क्लासेसच्या संचालकाचे नाव अाहे. यापैकी दाेघांना ताब्यात घेऊन पाेलिसांनी त्यांची चाैकशी केली. तर अन्य एकाचा शाेध घेतला जात अाहे. त्यांची नावे मात्र गाेपनीय ठेवण्यात अाली. 

बातम्या आणखी आहेत...