आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीव्र आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार दीड तास बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या मुंबई लाँग मार्चला पाठिंबा म्हणून शेतमजूर युनियन लाल बावटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचे  प्रवेशद्वार तब्बल दीड तास बंद राहिले. याचदरम्यान बैठक आटोपून  बाहेर पडलेल्या झेडपीच्या सीईओ मीना अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. के. राठाेड, आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांचे वाहन कार्यकर्त्यांनी अडवून  धरल्याने हे अधिकारी तब्बल दीड तास प्रवेशव्दारातच अडकले.  आंदोलकांचा संताप पाहून सीईओ, आरोग्य अधिकाऱ्यांनी २०० मीटर अंतर असलेले झेडपी कार्यालय पायी चालून गाठले.  


शेतकरी, मजुरांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या लाँग मार्चला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा देत सोमवारी शहरातून मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर  संतप्त मजूर व कार्यकर्ते प्रवेशव्दारासमोरच ठिय्या मांडून घोषणाबाजी करीत होते. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठक आटोपून झेडपीच्या सीईओ मीना अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. के. राठाेड, आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांची वाहने बाहेर पडण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ आली होती. परंतु, संतप्त शेतकरी, मजुरांनी ही वाहने प्रवेशद्वाराजवळच अडवून धरली. 

 

एक प्रवेशद्वार बंद  
 जिल्हाधिकारी कार्यालयात वाहने जाण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. परंतु यातील एक प्रवेशद्वारे गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. यामुळे एकाच प्रवेशद्वारातून अधिकाऱ्यांच्या वाहनांची ये-जा असते. दरम्यान, आजच्या आंदोलनामुळे तब्बल दीड तास अधिकाऱ्यांना ताटकळावे लागले. 

 

१२.३० ते २ पर्यंत गोंधळ  
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ १२.३० ते २ वाजेपर्यंत गोंधळ सुरू होता. प्रवेशद्वारातून वाहने जाऊ देण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना विनवणी केली. परंतु संतप्त आंदोलकांनी प्रवेशद्वाराजवळ घोषणाबाजी करीत ठिय्या दिल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता.

 

जिल्हा शल्य चिकित्सकांनाही रोखले
 आंदोलनामुळे  जिल्हा शल्य चिकित्सक एम. के. राठोड यांचे वाहनही अडकले होते. जिल्हा सामान्य रुग्णालय बऱ्याच अंतरावर असल्यामुळे त्यांनी आंदोलनकर्त्यांना दवाखान्यात रुग्ण आले आहेत. त्यांना तपासण्यासाठी वाहन सोडण्याची विनंती केली. परंतु, आंदोलकांनी वाहन जाऊ न देता, तुम्हाला दुचाकीवर सोडू, पण वाहन सोडणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे डॉ. राठोड यांनी आंदोलनानंतर रुग्णालय गाठले.

 

विश्रामगृहापर्यंत वाहनांच्या रांगा
घोषणाबाजी, संतप्त नागरिकांच्या गोंधळामुळे शासकीय विश्रामगृहापर्यंत वाहतूक खोळंबली होती.  वाहने जाऊ न दिल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा  वाहनातून उतरल्या. परंतु आंदोलकांनी त्यांचे वाहन बाहेर जाऊ दिले नाही. यामुळे त्यांना बाहेर उभ्या एका वाहनातून कार्यालयापर्यंत नेण्यात आले. परंतु आरोग्य अधिकारी डॉ.  गिते यांनी प्रवेशद्वाराच्या मागच्या बाजूने पायी जाऊन कार्यालय गाठले. 

बातम्या आणखी आहेत...