आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी : निधी वाटपावरून पालकमंत्री विरुद्ध आमदारांचा संघर्ष चिघळण्याची चिन्हे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - जिल्हा नियोजन समितीतील काम वाटपासह कामाचे आराखडे व निधीच्या वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सुप्त संघर्षाला तोंड फुटले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांसह समितीतील काँग्रेस, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे. पालकमंत्र्यांकडून अधिकाराचा गैरवापर झाल्याचा स्पष्ट आरोप शिवसेना वगळता अन्य सर्वच सदस्यांनी केल्याने हा संघर्ष आता अधिकच चव्हाटयावर येणार आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार डॉ.मधुसूदन केंद्रे, आमदार विजय भांबळे, राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला राठोड यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेतून नियोजन समितीवर आलेल्या सदस्यांच्या पुढाकारातून या संघर्षाला तोंड फुटले आहे. या सर्व सदस्यांनी जिल्हा प्रशासनाकडे पालकमंत्री पाटील यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. पालकमंत्र्या विरोधात उघड भूमिका घेताना दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांनी नियोजन समितीतील आजवरच्या काम वाटपाचा, त्या अनुषंगाने निधी वाटपाचा भांडाफोड करीत पालकमंत्री एकतर्फी कारभार चालवत असल्याचा आरोप केला आहे.  निधी वाटपाबाबतचे पुरावेही प्रशासनाला दिले आहेत.  


समितीत नेहमीच वाद 

जिल्हा नियोजन समितीत सुरुवातीपासूनच सातत्याने वादग्रस्त गोष्टी घडत राहिल्या.  समितीवर नियुक्त करावयाच्या सदस्यांपासून अनेक बाबतीत सातत्याने वाद होत राहिले. त्याही पेक्षा पालकमंत्री पाटील हे आल्यापासून समितीच्या बैठका दोन ते तीन वेळा रद्द करण्याची वेळ आली.  पाटील  जिल्ह्यासाठी  फारसा वेळच देऊ शकले नाहीत. अन्य विकास कामांपेक्षाही जिल्हा नियोजन समिती ही धोरणात्मक निर्णय घेत असल्याने व पालकमंत्री हे या समितीचे अध्यक्ष असल्याने अनेक निर्णय  त्यांच्या उपस्थितीशिवाय घेता येत नाहीत. 

 

ठराविक पालिकांनाच झुकते माप

पालकमंत्र्यांचे दौरेच रद्द होऊ लागल्याने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकाही  होत नाहीत. चार दिवसांपूर्वी  जिल्हा नियोजन समितीची बैठक पाटील यांचा दौरा रद्द झाल्याने होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक महत्त्वाचे निर्णय प्रलंबित आहेत. त्याही पेक्षा नियोजन समितीच्या काम वाटपात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यातही नगरपालिकांना निधीचे वितरण करताना काही ठराविक पालिकांनाच पालकमंत्र्यांकडून झुकते माप दिले गेल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. विशेषतः पाथरी व जिंतूर या पालिकांना डावलले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी व आमदार भांबळे यांनी केला आहे. 

 

शिवसेना मोहिमेपासून दूरच
समितीत अत्यंत कमी संख्येने असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी सोयीस्कररीत्या पालकमंत्र्या विरोधात दोन्ही काँग्रेसने सुरू केलेल्या मोहिमेपासून  दूर राहणे पसंद केले. मात्र, भाजप सदस्यांनी यात सहभाग नोंदवला.  त्यामुळे आगामी काळात नियोजन समितीच्या बैठकीत दोन्ही काँग्रेसची भूमिका संघर्षाची राहणार असल्याने विकास कामांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय होणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...