आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेतील शिपायाचा कुजलेला मृतदेह आढळला, खुनाचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - जिल्हा परिषदेतील शिपायाचा मृतदेह सोमवारी सकाळी त्याच्या राहत्या घरी कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना पेठ बीड भागातील गांधीनगर परिसरात उघडकीस आली.  दरम्यान, हा खुनाचा प्रकार आहे की इतर कुठल्या कारणाने मृत्यू झाला याबाबत पोलिस तपास करत असून शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पेठ बीड ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी दिली.


एकनाथ अण्णा मिटकरी (वय ४७, रा. गांधीनगर बीड) हे जिल्हा परिषदेमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून या दोघांचेही लग्न झाले आहे. त्यांचा मुलगा आष्टी येथे राहत असल्याने ते एकटेच आपल्या गांधीनगर येथील घरी राहत होते.  सोमवारी सकाळी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्याने दरवाजा उघडून बघितला असताघरात त्यांचा मृतदेह आढळून आला.

 

घटनेची माहिती पेठ बीड पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर ठाण्याचे पोलिस निरीक्षक बडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता एकनाथ यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचा खूनच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सदरील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता.

 

 सखोल चौकशी
एकनाथ यांचे कोणाबरोबर भांडण झाले होते का, इतर काही वादविवाद होते का यासह इतर बाबी पेठ बीडचे पोलिस तपासत असून त्यांचा कोणी खून केला असावा याबाबतची चर्चा सदरील परिसरामध्ये होत होती. या प्रकरणाचा अधिक तपास पेठ पोलिस करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...