आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तिहेरी तलाक’ कायद्याच्या विरोधात मोर्चा;केंद्राने मूलभूत अधिकार डावलून कायद्याचे षडयंत्र रचले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- केंद्र शासनाने मुस्लिम समाजाच्या मूलभूत अधिकारांना वाऱ्यावर ठेवून तिहेरी तलाक कायद्याचे षडयंत्र रचले आहे, असा आरोप करीत हा कायदा करण्यात येऊ नये, या मागणीसाठी मुस्लिम महिलांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर  जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.  


मोर्चेकरी महिलांनी आरोप केला की, तिहेरी तलाक कायदा  हा भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि धर्म भावना या सर्वांच्या विरोधात आहे. केंद्र सरकार वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळे रस्ते दाखवत आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाचे राजकीयकरण करून त्या आधारावर हा सर्व खेळ चालला आहे.  मुस्लिम महिला संरक्षण आणि अधिकार कायदा २०१७ या नावाने तयार करण्यात आलेला हा कायदा संसदेच्या खालच्या सभागृहात केंद्र शासनाचे बहुमत असल्याने पास झाला. परंतु आजही तो कायदा वरिष्ठ सभागृह राज्यसभेत बहुमताची वाट पाहत आहे. मुस्लिम धर्मीय संघटनांशी कोणतीही चर्चा न करता हा कायदा तयार करण्यात आला आणि त्याच्या विरोधातच आम्ही धरणे आंदोलन करत आहोत.


मुस्लिम मुत्ताहेदा महाज, नांदेड शाखा आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांच्या आदेशाने मुस्लिम महिलांनी आज केलेले धरणे आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने पार पडले. शहरातील विविध भागातून वेगवेगळ्या वाहनांनी महिला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्या. अनेक जागी त्यांच्यासाठी आणलेल्या वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली होती.

 

हजारोंच्या संख्येत स्वयंसेवकांनी महिलांना जाण्यासाठी रस्ता केला आणि सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्याऐवजी दुसऱ्या रस्त्याने जाण्याची विनंती केली. अनेक ठिकाणी महिलांसाठी पाण्याचीही सोय केली होती.  स्वयंसेवकांसाठी नाष्टा ठेवण्यात आला होता आणि प्रत्येक स्वयंसेवक सर्वसामान्य नागरिकांना काही अडचण होणार नाही आणि आंदोलनासाठी  जाणाऱ्या मुस्लिम महिलांना योग्य संरक्षणात जाता येईल, याची सोय केली होती. रस्त्यावरून परत जाताना स्वयंसेवकांनी कचराही उचलला.

 

..हा तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आवाज
केंद्र शासनाकडे स्वतःचा आवाज नसून तो आवाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे आणि हा कायदा तयार झाला तर मुस्लिम महिला जगू शकणार नाहीत.  त्यांना स्वातंत्र्य असणार नाही आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व हरवेल म्हणून आज आम्ही या विरुद्ध धरणे आंदोलन करत आहोत, असे मोर्चेकरी महिलांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...