आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचे प्रियकराच्या मदतीने अपहरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेर- अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीच्या अपहरणप्रकरणी पत्नीसह तिच्या प्रियकरावर ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पत्नी व प्रियकराला ढोकी पोलिस ठाण्यात १९ मार्चला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. 


उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील विजय रामभाऊ कांबळे यांना त्यांची पत्नी वैशाली विजय कांबळे हिने १६-१७ जानेवारी  २०१८ दरम्यान मुलांच्या आजाराचा बहाणा करून पुण्यात बोलावून घेतले. परंतु विजय पुण्यात गेल्यानंतर त्याचा नातलगांशी संपर्क तुटला. यामुळे विजयचे भाऊ नितीन कांबळे यांनी ढोकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 


मोबाइल लोकेशनवरून सुगावा :  ढोकीचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर मानभाव यांनी हवालदार प्रकाश राठोड यांना तपासासाठी पुणे येथे पाठवले. तेथे रेल्वे स्टेशन परिसरातील पोलिस ठाण्याच्या नोंदी तपासल्या. परंतु काहीच हाती लागले नाही. दरम्यानच्या काळात मोबाइल लोकेशन तपासण्यात आले. त्यामध्ये विजय कांबळे, त्यांची पत्नी वैशाली कांबळे व तिचा प्रियकर राहुल शहाजी भोसले हे काही काळ एकत्रितपणे असल्याचे आढळले. त्यानंतर सपोनी किशोर मानभाव यांनी फौजदार विजयकुमार वाघ व प्रकाश राठोड यांना पुन्हा पुणे येथे पाठवले. दरम्यान, विजय कांबळे यांची पत्नी वैशाली हिला चौकशीसाठी ढोकी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. चौकशीतून पोलिसांना वैशाली कांबळे व राहुल शहाजी भोसले यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. त्यादृष्टीने चौकशी करण्यात आली. अखेर ढोकी पोलिसांनी पती अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे राहुल शहाजी भोसले (रा. तळवडे, ता. हवेली, जि. पुणे) व पत्नी वैशाली यांनी विजय कांबळे यांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास हवालदार प्रकाश राठोड यांच्याकडे देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...