आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना-उष्णता वाढल्याने नगरसोल-नरसापूर रेल्वेचे इंजिन बंद पडल्याचा प्रकार शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडला. या प्रकारानंतर रेल्वेने पर्यायी इंजिन बसवले. मात्र ते कमी क्षमतेचे असल्याने ही रेल्वे जागेवरून पुढे सरकू शकली नाही. त्यामुळे करमाडजवळ थांबवलेल्या मालगाडीचे इंजिन बसवून तब्बल चार तासांनी ही रेल्वे मार्गस्थ करण्यात आली. या प्रकारामुळे चार एक्सप्रेस आणि एक पॅसेंजर गाडी उशिराने धावली. मात्र इतर रेल्वेच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होणार नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नगरसोल-नरसापूर ही गाडी नियमित वेळेनुसार १ वाजता जालना स्थानकावर पोहोचते. मात्र, शनिवारी दुपारी दीड वाजेदरम्यान बदनापूर ते जालना स्थानकादरम्यान या रेल्वेचे इंजिन बंद पडले. याची माहिती नांदेड नियंत्रण कक्षाला देण्यात आली.त्यावेळी मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसला जालन्यात थांबवण्यात आले. या गाडीचे १७ डबे ओढणारे इंजिन नरसापूर गाडीला जोडण्यात आले. मात्र त्याची क्षमता कमी असल्याने हे इंजिन बंद पडले. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या इंजिनचा शोध सुरु झाला त्यात जवळपास अडीच तासांचा वेळ गेला. तर या प्रकारामुळे हैदराबाद - औरंगाबाद या पॅसेंजर गाडीला रांजणी स्थानकावर थांबवले. तर सचखंड एक्स्प्रेसला बदनापूर रेल्वे स्टेशन वर २ तास थांबवण्यात आले. तर नांदेडकडे जाणाऱ्या सचखंड एक्स्प्रेसला करमाड मध्ये थांबा देण्यात आला. शिवाय मुंबई-नांदेड तपोवन ही रेल्वेही करमाड जवळ थांबविण्यात आली. दरम्यान जवळपास तीन तासानंतर एका मालगाडीचे इंजिन काढून नरसापूर एक्स्प्रेसला मागच्या बाजूने लावून ती बदनापूरपर्यंत आणली. त्यानंतर तपोवन एक्स्प्रेसला पुढे पाठवण्यात आले. तसेच सचखंड एक्स्प्रेसला नांदेडकडे रवाना करण्यात आले. शिवाय मालगाडीचे इंजिन पुन्हा मालगाडीला जोडून ही गाडी नरसापूरला पाठवली. त्यानंतर या रेल्वेसाठी अतिरिक्त इंजिन औरंगाबादहून मागवून दोन इंजिन लावून ती पुढे रवाना केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.