आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • परळीतील ‘बहिणी’वर शिवसेनेतील ‘भाऊ’ नाराज; लोकसभेलाही विरोधात उमेदवार Uddhav Thackeray And Pankaja Munde News In Marathi

परळीतील ‘बहिणी’वर शिवसेनेतील ‘भाऊ’ नाराज; लोकसभेलाही विरोधात उमेदवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्या बंडानंतर पंकजा मुंडेंना सातत्याने एकेका भावाच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. बीड- लातूर- उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेत मानलेले भाऊ राजेश कराड यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केला तर आता पंकजांना ‘बहीण’ म्हणाणारे शिवसेनेतील ‘भाऊ’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही पंकजांवर नाराज आहेत की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.

 

या मागीलही कारण तसेच आहे, पंकजांविरोधात या वेळी परळीत विधानसभेत उमेदवार उभा करण्याची घोषणा सेनेने यापूर्वीच केली त्यानंतर आता खासदार प्रितम मुंडे यांच्या विरोधातही लोकसभेला शिवसेना उमेदवार देणार असल्याची घोषणा नुकतीच मराठवाडा संपर्क प्रमुख खासदार चंद्रकांत खैरेंनी बीडमध्ये केली आहे. त्यामुळे गतवेळी बहिणीच्या प्रेमापोटी विरोधात उमदेवार न देणारी सेनेचा आता पंकजांना कडवा विरोध करणार आहे.

 

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील स्नेह सर्वपरिचित आहे. युतीच्या शिल्पकारांपैकी एक असलेल्या मुंडेंनी अनेकदा भाजप सेनेच्या कुरबुरीत मिटवण्यात महत्वाची भूमिका बजावली तर मुंडेंच्या प्रेमापोटी बीड जिल्ह्यातही शिवसेनेने सहा विधानसभा मतदार संघांपैकी पाच मतदार संघ भाजपला सोडले होते. केवळ बीड विधानसभा मतदार संघ सेनेकडे होता. एकेकाळी बीडसह माजलगाव व इतर तालुक्यांतही प्रभावी असलेली शिवसेना मतदारसंघ नसल्यामुळे हळूहळू जिल्ह्यात प्रभावहिन ठरु लागली तर दुसरीकडे बीड विधानसभेत चांगली कामगिरी करताना मध्यंतरी संघटनात्मक बांधणी न झाल्याने एकमेव मतदार संघातही सेनेची पिछेहाट झाली. दरम्यान, गतवेळी भाजप सेना युती अचानक तुटल्याने जिल्ह्यात सर्व मतदार संघात उमदेवार उभा करताना शिवसेनेची दमछाक झाली. त्यातच गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर होणारी निवडणुक असल्याने व मुुंडे परिवाराशी असलेला स्नेह लक्षात घेऊन उद्धव यांनी पंकजा मुंडे या माझी बहिण असल्याने परळी विधानसभा मतदार संघात त्यांच्या विरोधात उमदेवार देणार नाही अशी घोषणा केली होती.

 

2019 च्या निवडणुकांसाठी शिवसेनेने स्वबळाची पूर्ण तयारी राज्यपातळीवर केली आहे. याचाच भाग म्हणून संघटनात्मक बांधणीवर सेना लक्ष देत आहे. जिल्ह्याचे दोन्ही जिल्हाप्रमुखही सेनेने चार महिन्यांपूर्वी बदलले असून जिल्ह्यातही सेनेकडून भाजप टार्गेट होत आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदार संघात गतवेळी पंकजां विरोधात उमदेवार न देणाऱ्या सेनेने आगामी निवडणुकांत मात्र उमेदवार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पाठोपाठ आता दुसऱ्या भगिनी खासदार प्रितम मुंडे यांच्या विरोधातही लोकसभेला शिवसेनेचा उमदेवार उभा असेल. नुकताच मराठवाडा संपर्क प्रमुख खासदार चंद्रकांत खैरेंचा बीड दौरा झाला. यामध्ये त्यांनी ‘गोपीनाथ मुंडेंच्या नंतरची पिढी शिवसेना व शिवसैनिकांचा सन्मान करणारी नाही’ मोठे विधान करत थेट मुंडे भगिनींवर निशाणा साधला. लोकसभेच्या उमेदवाराची लवकरच घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगत शिवसैनिकांनी कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले. यामुळे उद्धव ठाकरे मुंडे भगिनींवर नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर आता पंकजा काय प्रतिक्रीया देतात हे पाहणे औत्सुक्याचे असले तरी जिल्ह्यात आणखी एका विरोधकाची भर मात्र पडली आहे हे निश्चित.

 

बातम्या आणखी आहेत...