आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष; तीस वर्षांपासून ऊस रसवंतीचा चरखा ओढून संसार केला गोड!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- फेब्रुवारीच्या सुरुवातीला त्यांना गाव सोडण्याचे वेध लागतात. उसाचा रस काढण्यासाठी लागणाऱ्या लाकडी चरखा व वजा गाड्याची दुरुस्ती केली जाते. त्यानंतर ३०० किलोमीटर अंतरावरील शहरात जावून  रसवंतीचा गाडा हाकत चार महिने घाम गाळून वर्षभर घर चालेल याची तरतूद केली जाते. तब्बल ३० वर्षांपासून सुमित्रा आसाराम गिते (६०) या संसाराचा गाडा हाकण्यासाठी हा व्यवसाय करत आहेत. 


अहमदनगर जिल्ह्यातील करंजी या गावची आणि चौथीपर्यंत शिक्षण झालेली ही महिला मागील ३० वर्षापासून परभणी शहरातील काही ठिकाणी उसाच्या रसवंतीचा लाकडी गाडा चालवताना दिसत असते. याही वर्षी ती मुलासह येथे दाखल झाली आहे. शिवाजीनगरातील राजगोपालाचारी उद्यानाच्या कडेला झाडांची सावली घेत गाड्यावरील चरख्यातून  उसाचा रस नागरिकांना पाजण्याचे काम ती करत आहे. अर्थात, इलेक्ट्रिक मशीनमधील उसाचा रस पिण्यापेक्षा नागरिकांची अधिकची पसंती या हातगाड्यावरील लाकडी चरख्यातील रसालाच अधिक असते. यामुळे दिवसाला २०० ते ३०० रुपये मिळून खर्च भागतो. संसार चालतो.  


वर्षातील आठ महिने शेतमजुरीचे काम करणाऱ्या गीते कुटुंबाचे प्रमुख आसाराम गीते यांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्यासोबतच दरवर्षी उन्हाळ्यात सुमित्रा परभणीत येत असत. परंतु, पतीच्या निधनानंतरही चरितार्थासाठी त्यांनी गाडा सोडला नाही.  मुलासाठीही एक लाकडी चरखा व स्वत: साठी एक असे दोन गाडे घेवून त्या येथे दाखल होतात. ऊस खरेदीपासून ते बर्फ, आद्रक आदी साहित्याची खरेदी करून हे मायलेक दोन वेगवेगळ्या ठिकाणी उन्हाळ्यात हा व्यवसाय करतात. राहण्यासाठी एक खोली भाड्याने करून चार महिने त्यांचा असाच दिनक्रम चालतो. 

 

संसाराचा गाडा यावरच

सुमित्रा गीते ३० वर्षांपासून दर उन्हाळ्यात परभणीत येवून रस विकतात. मात्र, उसासह अन्य वस्तूंचे भाव वाढले आहेत. मात्र, गाड्यावरील लाकडी चरख्यातील उसाचा रस सर्वांना आवडत असल्याने व्यवसायही बऱ्यापैकी होतो. हातात चार पैसे येत असल्याने निदान चार महिन्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागतो. 

 

 

करंजीतील १०० कुटुंबे याच व्यवसायात 
नगर जिल्ह्यातील करंजी या छोटयाशा गावातील जवळपास १०० कुटुंबे याच व्यवसायात आहेत. प्रत्येकाने महाराष्ट्रातील मुंबईपासून ते सर्वच गावे जणू काही वाटूनच घेतली आहेत. त्यामुळे या आमच्या गावातील त्या त्या ठिकाणी गाडा चालवणाऱ्यांची स्थानिक लोकांशी ओळखच झाली असल्याचे  सुमित्रा गिते यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...