आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागासवर्गीयांचे आरक्षण डावलण्याचा प्रयत्न; साहित्यिक डॉ. धनराज डाहाट यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- भारतीय राज्यघटनेला सध्या काही प्रमाणात धोका निर्माण झाला असून मागासवर्गीय समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सध्याचे सरकार करू पाहत आहे. सरकारने शासकीय नोकऱ्या बंद करून आरक्षण गोठवण्याचे काम चालवले आहे. एक प्रकारे आरक्षण कुजवण्याचे काम सध्याच्या सरकारने चालवले आहे, याचा विचार आंबेडकरवादी जनतेने केला पाहिजे, असे प्रतिपादन सत्यशोधक विचारमंच व फुले-आंबेडकर विचारधारा नांदेडच्या वतीने आयोजित केलेल्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ. धनराज डाहाट यांनी केले.


सत्यशोधक विचारमंचाच्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी रविवारी डाहाट बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले, उद्घाटक दीपक कदम, प्रा. फकरोद्दीन बेन्नूर, बबन जोगदंड, स्वागताध्यक्ष सायलू म्हैसेकर, निमंत्रक डॉ. नागेश कल्याणकर, शिलवंत वाढवे, डॉ. विशाखा कांबळे, महापौर शीला भवरे, रमणी सोनवणे, डॉ. डी.टी. गायकवाड, विलास सिंदगीकर आदींची उपस्थिती होती.


डाहाट म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देताना सर्वप्रथम ओबीसी समाजाचा विचार केला होता. त्यानंतर इतर मागासवर्गीय समाजाचा त्यांनी विचार केला. सध्याचे सरकार मागासवर्गीय समाजाचे आरक्षण बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करणारे कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी यांची हत्या झाली.  यामुळे समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशोधक विचारमंचचे अध्यक्ष  कोंडदेव हाटकर यांनी केले. त्यांनी १९९८ पासून साहित्य संमेलनाची केलेली सुरुवात त्यात लाभलेले अनेक मान्यवरांची उपस्थिती याबद्दल माहिती देऊन उजाळा दिला.


कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. नागेश कल्याणकर आणि उद्घाटक डॉ. दीपक कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज समाजाला असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात सत्यशोधक समाज भूषण पुरस्काराने पत्रकार प्रशांत गवळे,  विजय गोणारकर, पत्रकार  कुंवरचंद मंडले आदींना सन्मानित करण्यात आले.


आंबेडकरी विचारांनीच होईल परिवर्तन
देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने परिवर्तन होईल. डॉ. आंबेडकरांचे विचार आणि आचार समजून घेतले पाहिजेत. समाजाच्या विकासासाठी साहित्याची निर्मिती आवश्यक असल्याचेही डाहाट म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...