आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी आवश्यक: माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लोकसभा आणि विधानसभेच्या २०१९ सालात होणाऱ्या निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी करून लढवल्या तर मतांचे विभाजन टळेल  आणि जातीयवादी शक्ती सत्तेतून खाली उतरतील, असे मत ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. सोमवारी लातूर बाजार समितीमार्फत आयोजित एका कार्यक्रमासाठी ते लातूरमध्ये आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार अमित देशमुख, आमदार त्र्यंबक भिसे, ज्येष्ठ काँग्रेस नेते त्र्यंबकदास झंवर, माजी आमदार वैजनाथ शिंदे, बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांची यावेळी उपस्थिती होती.  


बाळासाहेब पुढे म्हणाले की, केंद्र सरकारचा कारभार लोकाभिमुख नाही. शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. जीएसटी आणि नोटबंदीमुळे लहान-मोठे व्यापारी अडचणीत आले आहेत.  औद्योगिक आणि कृषी आधारित अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे. दुसरीकडे राज्य सरकारची कामगिरीही अत्यंत सुमार आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आंदोलन करीत होतो. त्यानंतर शेतकरीही रस्त्यावर उतरले. त्यामुळे सरकारने लोकलज्जेस्तव कर्जमाफी जाहीर केली. मात्र निकष लावून ती  बळजबरीने केल्याचे सिद्ध झाले आहे. 


विरोधी पक्षनेत्यांचे काम उत्तम 
विधिमंडळात केवळ विधान परिषदेच्याच विरोधी पक्षनेत्यांचा आवाज घुमताना दिसतो. मात्र विधानसभेत  तसे  दिसत नाही. या प्रश्नाला त्यांनी हसून बगल दिली. पारंपरिक विरोधक  राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता विरोधी पक्षनेत्यांचे काम उत्तम सुरू असल्याचा निर्वाळा थोरातांनी दिला. 


विलासरावांच्या आठवणीने थोरात भावुक 
लातूरमध्ये आज कित्येक दिवसांनी आलोय. विलासराव मुख्यमंत्री असताना दर पंधरा दिवसांना यावे लागायचे.   त्यांच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री झालो. पुढे त्यांनीच कृषिमंत्री पद दिले. त्यांनी लातूर-उस्मानाबादचे पालकमंत्रीपद  दिले होते, असे सांगत त्यांनी विलासरावांच्या आठवणी जागवल्या.

बातम्या आणखी आहेत...