आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाची केली जाऊ शकते डीएनए टेस्ट?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- युवकाचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रकार सोमवारी अंबड तालुक्यातील कुरण शिवारात उघडकीस आला होता. या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असला तरी प्रमुख संशयित आरोपी धुमाळ याचे पूर्ण नाव निष्पन्न करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. दुसरीकडे अर्धवट जळालेल्या युवकाची ओळख पटली असली तरी आवश्यकता भासलीच तर डीएनए टेस्ट करण्यासाठीची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे.   


बीड जिल्ह्यातील समनापूर येथील युवक अनंत श्रीकांत इंगोले याची गळा दाबून हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह अंबड तालुक्यातील कुरण शिवारात भररस्त्यावर जाळण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात मृत युवक अनंत याचे काका भास्कर इंगोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून धुमाळ नावाच्या व्यक्तीसह अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी हा धुमाळ कोण,  याचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी पोलिसांनी अनंताच्या घरातील काही व्यक्तींकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी धुमाळ यांना आपण ओळखत नसल्याचे सांगितले. अनंत गेल्या वर्षभरापासून औरंगाबाद येथे राहत होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील लोकांबाबत घरच्यांनाही फारसे माहीत नव्हते. 


त्यामुळे पोलिसांनी आता अनंतचा ग्रामसेवक असलेला मित्र तुकाराम घोलप आणि पुणे येथील इंजिनिअर भावाकडून काही माहिती मिळते का यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 


वॉचमनची तत्परता   
समर्थ सहकारी साखर कारखान्यातील एका वॉचमनला रस्त्यावर मृतदेह जळत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने ही माहिती कारखान्यातील सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यास कळवली. तेथून पोलिसांना माहिती देण्यात आल्याने रात्र गस्तीवर असलेले पीएसआय विकास कोकाटे काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने मृताच्या खिशातील कागदपत्रे जळाली नाही व मृताची ओळख पटवता आली. 


आरोपीकडे दोन मोबाइल   
या प्रकरणातील आरोपी धुमाळ याच्याकडे दाेन मोबाइल क्रमांक होते व हे दोन्हीही तो वापरत होता अशी माहिती समोर येत आहे. त्यासंदर्भातील सर्व डिटेल माहिती पोलिसांनी संबंधित मोबाइल कंपन्यांकडून मागवली आहे. या मोबाइलमधील सिमकार्ड कुणाच्या नावे होते,त्याचा प्रत्यक्ष वापर कोण करत होते अशा प्रश्नांची उत्तरे यातून मिळवण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.    


डीएनए टेस्ट कशासाठी   
- तो अर्धवट जळालेला मृतदेह अनंत इंगोले याचाच हाेता हे निश्चित करणे    
- सुनावणीदरम्यान न्यायालयात प्रश्न उपस्थित झालाच तर पोलिसांकडून खबरदारी   
- पैशाच्या वादातूनच खून झाल्याचा संशय असला तरी अन्य शक्यतांचाही विचार   
- अन्य  पैलू पुढे आले तर  पूर्वतयारी म्हणून डीएनए टेस्ट   


आवश्यकता भासली तर   डीएनए टेस्ट
मृत युवक अनंत इंगोले हाच असल्याची शंभर टक्के खात्री पटली आहे. नातेवाइकांनीही त्यास ओळखले आहे. यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित होऊ शकतात हे गृहीत धरून आम्ही डीएनए टेस्टसाठी शरीराचा एक छोटासा भाग ठेवून घेतला आहे. आवश्यकता पडली तरच ही टेस्ट केली जाईल.   
- रमेश सोनुने, उपविभागीय पोलिस अधिकारी, अंबड  

बातम्या आणखी आहेत...