आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेवराई : चालकाचा ओव्हरटेक करताना ताबा सुटल्याने बस उलटली, 28 प्रवासी बचावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई -  समोरून येणाऱ्या वाहनाला कट मारून ओव्हरटेक करताना चालकाचा बीड-कोपरगाव बसवरील ताबा सुटल्याने बस उलटली. सुदैवाने बसमधील २८ प्रवासी बचावले. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेसात वाजता गेवराईजवळील शासकीय विश्रामगृहासमोर घडला. बसमधील  जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सुट्टी देण्यात आली. 

 
नगर जिल्ह्यातील कोपरगाव आगारातील बस (एमएच १४ बीटी ३४६९) बीड मुक्कामी होती.  मंगळवारी सकाळी पावणेसात वाजता बस बीडहून कोपरगावकडे चालक स्वप्निल मडावी व वाहक भागवत जाधव  हे २८ प्रवाशांना घेऊन गेवराईकडे  जात असताना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय विश्रामगृहासमोरील वीज उपकेंद्राजवळ सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे बस उलटली. या अपघातामुळे बसमधील प्रवासी घाबरून गेले.

 

प्रवासी शेख ख्वाजामिया इब्राहिम (रा. बीड) यांच्यासह  अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले. माहिती मिळताच गेवराईचे आगारप्रमुख एस.पी.साळुंके यांनी घटनास्थळी भेट दिली. बसमधील प्रवासी गेवराई, उमापूर, शेवगाव येथील होते.  दरम्यान, समोरच्या वाहनाला कट मारून किंवा ओव्हरटेक करताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे दिसते.दरम्यान, बसचालक स्वप्निल मडावी यांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे  आगारप्रमुख एस. पी. साळुंके यांनी सांगितले.

 

जखमींना मदत 
 जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जखमींना आगाराच्या वतीने तत्काळ आर्थिक मदत देण्यात आली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर विभागीय नियंत्रक गौतम जगतकर, विभागीय वाहतूक अधिकारी हर्षद बनसोडे  यांनी भेट देऊन माहिती घेतली.  

बातम्या आणखी आहेत...