आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घड्याळ घातलेला ‘हात’ अन‌् जगदाळेंचा घात, सुरेश धस म्हणतात, मला सगळ्यांचीच मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - रमेश कराडांच्या जिवावर काँग्रेसची जागा स्वत:कडे घेऊन राष्ट्रवादीची सुरुवातीलाच पंचाईत झाली; मात्र त्याचा अखेर पराभवातून झाला. १००४ पैकी सुमारे ५२८ मतांची गोळाबेरीज असूनही आघाडीने पुरस्कृत केलेला उमेदवार ७६ मतांनी पराभूत होतो आणि  केवळ ३६८ मतांची आकडेवारी असलेल्या महायुतीचा उमेदवार विजयी होतो हा विशेषत: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चिंतनाचा विषय ठरला आहे. अर्थात काँग्रेसच्या नेत्यांनी विश्वासघात केला, असा आरोप पराभूत उमेदवाराने केला असला तरी सुरेश धस यांच्या म्हणण्यानुसार त्यांना सगळ्याच पक्षांनी मदत केल्याने विशेषत: घड्याळ घातलेल्या हातांनी मदत केल्याने राष्ट्रवादीला स्वत:च्या पक्षातील कार्यकर्त्यांचाही प्रामाणिकपणा तपासण्याची वेळ आली आहे. 

  
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा मंगळवारी(दि.१२) निकाल जाहीर झाला. बीड येथील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव करीत दणदणीत विजय संपादित केला. धस यांना ५२७ तर जगदाळे यांना ४५१ मते मिळाली. २५ मते बाद झाली. वास्तविक, या निवडणुकीत सुरुवातीपासूनच अनेक रंजक घटना घडल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या उर्वरित ५ निवडणुकांपैकी उस्मानाबाद-लातूर-बीडची निवडणूक अधिक चर्चेची ठरली. मुळात ही जागा काँग्रेसकडे होती. (स्व.)विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांनी तीनवेळा ही जागा जिंकली होती.

 

मात्र, या वेळी त्यांनी निवडणूक न  लढण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीने ही जागा लढवली. सुरुवातीला भाजपमधील नेते रमेश कराड यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने मोठी राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, कराड यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादीला मोठा दणका बसला.पराभवाची नांदी येथूनच सुरू झाली.  परिणामी अशोक जगदाळे या अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत म्हणून पाठिंबा द्यावा लागला. मात्र, कराड यांच्या माघारीने राष्ट्रवादीचे अवसान गळाले होते. तरीही पुरस्कृत उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभी करून लढण्याची तयारी करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यातील मतभेद विचारात घेता काँग्रेस व राष्ट्रवादीचे सूत जुळण्याची शक्यता कमीच दिसत होती.

 

त्यातून उचित संदेश जाण्यासाठी उभय पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही एकच आहोत,आघाडीचा धर्म नक्की पाळू, असे सांगितले. उस्मानाबाद, लातूर आणि बीड, अशा तिन्ही जिल्ह्यात दोन्ही पक्षातील नेते माध्यमांना सामाेरे गेले. मात्र, आघाडीचा धर्म पाळला गेलाच नाही, हे निकालातून स्पष्ट झाले आहे.  


गेलेल्या मतदारांनाही गृहीत धरले

काही महिन्यांत राष्ट्रवादी तसेच काँग्रेसमधील अनेक सदस्य भारतीय जनता पक्षामध्ये गेले आहेत. विशेषत: जिल्ह्यातील भूम पालिकेच्या गटनेत्यासह १८ नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला.मात्र राष्ट्रवादीने ही मतेही गृहीत धरली. नाराज काँग्रेस नेत्यांचे मत वळवण्यात अपयश आले.


विजयात लातूर काँग्रेसचा वाटा? 
 भाजपचे सुरेश धस यांच्या विजयात लातूरमधील काँग्रेसच्या मतांचा मोठा वाटा असल्याची चर्चा आता रंगली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारण्याचा रमेश कराडांचा निर्णयही योग्य ठरल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या मतदारसंघातून गेल्या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसचे दिलीपराव देशमुख विजयी झाले होते. त्यांनी या वेळेस माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीने या मतदारसंघावर दावा सांगितला. त्यांची मतदार संख्या जास्त असल्याने काँग्रेसनेही ही जागा राष्ट्रवादीला देऊन टाकली. परंतु कागदावर मतदार संख्या जास्त असूनही मंगळवारी निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्षात भाजपच्या उमेदवाराने अधिक मते मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 

भाजपच्या यशाची नांदी, काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका    
आगामी वर्षभरात लोकसभा,त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्यांकडून केले जात आहे. मात्र, विधान परिषद निवडणुकीत स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना मदत करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत. त्यामुळे त्याचा फायदा नगण्य शक्ती असलेल्या भाजपला होऊ लागला आहे. आगामी काळात आघाडीत बेबनाव कायम राहण्याची दाट शक्यता आहे.

 

बाद मतांवरून दोघांत बाचाबाची, निकालालाही उशीर 
२१ मे रोजी निवडणूक झाली होती.मात्र, बीडमधील १० नगरसेवक अपात्र ठरवण्यात आल्याच्या मुद्यावरून हे प्रकरण न्यायालयात गेले, त्यामुळे मतमोजणीला उशीर लागला. यादरम्यान सुरेश धस व अशोक जगदाळे यांच्यासह मतदारांत निकालाबाबत उत्सुकता होती. मंगळवारी सकाळी मतमोजणीदरम्यान दोन्ही उमेदवार मतमोजणी कक्षात उपस्थित होते. या वेळी ४५ मते संदिग्ध असल्याचे समोर आले. या वेळी धस व जगदाळे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांना अलर्ट केले. कार्यकर्त्यांमध्येही सामना रंगू लागला. त्यामुळे मतमोजणी थांबविण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दोघांचीही समजूत घालून मतमोजणीची प्रक्रिया सुरू केली. मात्र मतमोजणी झाल्यानंतरही अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी तासाभराचा अवधी गेला. 

बातम्या आणखी आहेत...