आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यह पंजाब नॅशनल बँक है, ऐसा थोडा ही होता है, कोई भी आये और कर्जा मांगे! शाखा व्यवस्थापकाची भाषा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- ‘अरे भाई पंजाब बँक है, ऐसा थोडाही है, कोई भी आये और कर्जा मांगे’, हे शब्द आहेत ज्या निरव मोदीने सुमारे ११ हजार ४०० कोटींचा चुना लावला त्या पंजाब नॅशनल बँकेच्या उस्मानाबाद शाखेच्या व्यवस्थापकाचे. कोट्यवधींचे कर्ज बुडवणाऱ्या निरव मोदी, माल्ल्या किंवा कोठारीसारख्या मोठ्या उद्योगपतींना  कर्ज देणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांची सामान्य व्यापाऱ्यांना कर्ज देताना काय भूमिका असते, याचा शोध घेण्याचा ‘दिव्य मराठी’ने प्रयत्न केला. त्यातून बहुतांश बँकांचे व्यवस्थापक सामान्यांबाबत, नवतरुणांना कर्ज देण्याबाबत उदासीन असल्याचे समोर आले. काही बँक प्रतिनिधींनी तर सुरुवातीला कर्ज देताच येत नाही, आधी स्वखर्चातून उद्योग सुरू करण्याचा सल्ला दिला. गेल्या १७ वर्षांत ४ लाख, ३२ हजार,६९३ कोटींची कर्जमाफी देण्यात आली असून, यामध्ये सर्वाधिक वाटा बड्या उद्योगपतींचा आहे. देशातील बड्या उद्योगपतींना ८० टक्के कर्जपुरवठा करण्यात आलेला असून कर्ज बुडवण्यात माल्ल्या, कोठारी, निरव मोदींसारख्यांचा सर्वाधिक समावेश आहे. बड्या उद्योगपतींवर कर्जवाटपाची खैरात करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँका सामान्य तरुणांना, शेतकऱ्यांना कर्जासाठी दारातही पाऊल ठेऊ देत नाहीत. वास्तविक, कर्ज नियमित फेडणाऱ्यांमध्ये सामान्य उद्योजक, शेतकरीच सर्वात पुढे आहेत, असे काही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी खासगीत सांगितले. दरम्यान, निरव मोदीने कर्ज बुडवल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब बँकेच्या उस्मानाबाद शाखेची नेमकी स्थिती काय आहे, अन्य राष्ट्रीयीकृत बँकांचीही  भूमिका जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी (दि.२७) थेट बँकेच्या शाखेत जाऊन पडताळणी केली. तेव्हा नव्याने उद्योग करणाऱ्या सामान्यांबद्दल किंवा व्यवसाय सुरू असलेल्या व्यापाऱ्यांबद्दल कर्ज देण्याची मानसिकताच नसल्याचे स्पष्ट झाले. 

 

बँकेकडून नवीन व्यापार करणाऱ्यांना असहकार

काय म्हणतात बँकांचे अधिकारी-कर्मचारी (आमच्या प्रतिनिधींनी 
व्यावसायिकाच्या भूमिकेत थेट संपर्क केल्यानंतरचा संवाद जशाचा तसा)

 

पंजाब नॅशनल बँक (फाेन काॅल) 
- प्रतिनिधी : सर, मैने आपको कल फोन किया था, ज्वेलरी, डायमंड का व्यवसाय कर रहाँ हूँ, कर्जा चाहिए 
- व्यवस्थापक : ‘आपका खाता कहाँ है ? 
- प्रतिनिधी : तुळजाभवानी बँक में है, 
- व्यवस्थापक : तो आप वहाँ जाइए,अरे, ये पंजाब बँक है, ऐसा थोडाही होता है, कोई भी आए और कर्जा मांगे... 
- प्रतिनिधी : लेकीन मुझे यहाँ से कर्जा लेने के लिए क्या करना पडेगा। 
- व्यवस्थापक :  पहले खाता खोलिए, ६-७ महिने बाद देखेंगे, वैसे तो अभि कर्जा देना बंद है।

 

एसबीआय (जिल्हा न्यायालय शाखा)
- प्रतिनिधी : नमस्कार, कर्जाबाबत चौकशी करायची आहे. 
- व्यवस्थापक : कसले कर्ज पाहिजे तुम्हाला.
- प्रतिनिधी : दुधापासून पदार्थ तयार करायच्या व्यवसायासाठी. 
- व्यवस्थापक : सध्या कर्ज देणे बंद आहे. स्टाफचा प्रॉब्लेम आहे. फिल्ड ऑफिसरची पदे रिक्त आहेत, मी काही करू शकत नाही. 

 

एसबीआय (बसस्थानक) 
- प्रतिनिधी  : व्यावसायिक कर्जाची गरज आहे सर. 
- व्यवस्थापक : तुम्ही तुमच्या दत्तक बँकेत जाऊन विचारा. 
- प्रतिनिधी : तेथे देत नाही म्हणतात. 
- व्यवस्थापक : आम्हाला ऐवढेच काम आहे का, कर्जमाफीच्या कामाचे ओझे आहे. सकाळी एक काम ठरवलेले असते. नंतर आदेश आल्यामुळे दुसरे ऐनवेळी काम करावे लागते. 
- प्रतिनिधी : त्याचा ह्या कर्जाचा काय संबंध. 
- व्यवस्थापक : अहो एकतर स्टाफ कमी, मार्च ऐन्ड आहे. आता कर्जाचे काही होऊ शकत नाही.

 

 बँक ऑफ बडोदा 
- प्रतिनिधी : सर, कर्जाची चौकशी करण्यासाठी आलो होतो. 
- कर्मचारी : सध्या इन्स्पेक्शन आहे, आता तर हे शक्य होणार नाही. कशासाठी हवे आहे. 
- प्रतिनिधी : दुधापासून विविध पदार्थ तयार करायचा व्यवसाय करायचा आहे. सध्या छोटा मोठा व्यवसाय आहे. पण यात वाढ करायची आहे. 
- कर्मचारी : मला तुमच्या सध्याच्या व्यवसायाला भेट द्यावी लागेल. 

 

बँक ऑफ इंडिया 
- प्रतिनिधी : सर, मला व्यवसायासाठी कर्ज पाहिजे. 
- कर्मचारी : जी बँक गावाला दत्तक आहे. त्याच बँकेत जाऊन भेटा 
- प्रतिनिधी : सर, ती बँक कर्ज देत नाही म्हणते. 
- कर्मचारी : तुमचे गाव  दत्तक असते तर दिले असते. कर्ज देऊ शकत नाही. विषय संपला.

 

कॅनरा बँक, 
- प्रतिनिधी :  बँकेच्या नियमांची पूर्तता करून मला कर्ज द्यावे. 
- कर्मचारी : एकतर वसुलीच्या बाबतीत उस्मानाबाद बाद आहे. वसुली काहीच होत नाही. १२ हजार कोटी कोणी घेऊन पळाला तर वेगळी गोष्ट असते. पण प्रत्यक्ष शाखा स्तरावर अनेक नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. वरिष्ठांना भेटा एखाद्या वेळेस ते काय म्हणतात पाहा.

 

अजब सल्ला

बँकांच्या अनास्थेमुळे अजूनही राष्ट्रीयीकृत बँकांना मोदी, कोठारी, माल्ल्ल्याच हवे आहेत का, असा सवाल उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे खिशात रक्कम नसताना उद्योग करू पाहणाऱ्यांसाठी मुद्रा कर्ज योजना अस्तित्वात असतानाही बँकांचे अधिकारी मात्र खिशातून पैसे घालून आधी उद्योग सुरू करण्याचा सल्ला देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...