आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • One year old Baby Throws Her Mother Away From The Bus

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकवर्षीय बाळाला आईने चालत्या बसमधून फेकले; दीड तास ताटकळले प्रवासी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड / परळी- बार्शी येथील साखर कारखान्याकडे बसने निघालेल्या ऊसतोड कामगार महिलेने भर दुपारी रणरणत्या उन्हात बसच्या खिडकीतून पोटच्या एका वर्षाच्या बाळाला फेकून दिले. सोबत असलेल्या दीर व जावेने आरडाओरड करून बस थांबवत रस्त्यावर पडलेल्या पुतण्याला कवेत घेतले. याचवेळी परळीकडे  जाणाऱ्या रुग्णवाहिकेतून बाळाला परळीत दाखल केले.  बाळावर प्रथम परळी व नंतर  अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी ऊसतोड कामगार महिलेच्या दिराने पोलिसांना जबाब दिला  असून  वेडाच्या भरात भावजईने हे कृत्य  केल्याचे म्हटले आहे.  ही घटना परळी जवळील कन्हेरवाडी घाटात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता  घडली. 


परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील सुरळेगाव येथील  नारायण भाऊराव गेतगे  याचे कुटुंब ऊसतोडणीचे काम करते.  तीन महिन्यांपूर्वी नारायण, त्याची पत्नी इंदुबाई व भावजई रेखा असे तिघे जण बार्शी तालुक्यातील उपळाई साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी गेले होते.  ७ मार्च रोजी इंदुबाई, नारायण,   रेखा व तिचा एक वर्षाचा मुलगा प्रेम असे चार जण परभणी येथून सुरळेगावला गेले होते. गावात एक दिवस थांबल्यानंतर ते परत  शुक्रवारी सकाळी आठ वाजता  बार्शीला जाण्यासाठी  सुरळेगावहून रेल्वेने परळीला आले. परळी बसस्थानकावरून परळी ते पंढरपूर बसमध्ये (बस क्र. एम.एच.१४ बी. टी. २११४)बसले.  ही बस परळी बसस्थानकातून १२ वाजता बार्शीकडे निघाली.   दुपारी साडेबारा वाजता ती कन्हेरवाडी घाटात  पोहोचली असता रेखाने  तिच्या मांडीवरील एक वर्षाच्या प्रेमला  हातात घेऊन अचानक  बसच्या खिडकीतून बाहेर फेकले. हा प्रकार पाहून दीर नारायण व त्याच्या पत्नीने आरडाओरड     केल्याने      चालक वैजनाथ  राऊत व वाहक भागवत रुपनर यांनी  बस थांबवली.    रस्त्यावर पडलेल्या प्रेमला उचलून घेतले. त्याच्या डोक्याला व नाकाला मार लागला होता.  त्याचवेळी बसच्या पाठीमागून आलेली रुग्णवाहिका थांबवून प्रेमला परळी व नंतर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले.  डॉक्टरांनी तपासणी करून प्रकृती बरी असल्याने बालकाला रुग्णालयातून सुट्टीही दिली.

बस पोलिस ठाण्यात आणली

बसचालक व्ही. आर. राऊत  यांनी पंढरपूरकडे जाणारी बस  वळवून परळी ग्रामीण ठाण्यात नेऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली. या गोंधळात जवळपास दीड तास गेला.  प्रवासीही ताटकळले होते.    रेखा हीचा दीर नारायण भक्तराम गेतगे यांचा पोलिसांनी जबाब नोंदवून घटनेची नोंदही घेतली. 

 

रेखा वेडसर असल्याची माहिती 

परळी ग्रामीण पोलिसांनी दरी नारायण यांचा जबाब घेतला असून त्यानुसार रेखा ही  गेल्या एक वर्षापासून मनोरुग्ण आहे. तिच्यावर उपचारही सुरू आहेत. वेडाच्या भरात तीने हे कृत्य केल्याचे म्हटले आहे.