आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LATUR MURDER : चव्हाणांच्या हत्येसाठी पिस्तूल पुरवणाऱ्यास केजमधून अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज- लातूर येथील स्टेप बाय स्टेप क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येचे नवे "केज कनेक्शन' साेमवारी समोर आले. चव्हाण यांच्या हत्येसाठी केजच्या तरुणाने मारेकऱ्यांना पिस्तूल पुरवल्याचे समोर आले आहे. रमेश मुंडे असे या तरुणाचे नाव असून लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी रविवारी रात्री त्यास केजमधून अटक केल्याची माहिती शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी दिली. 


लातूर येथील स्टेप बाय स्टेप क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा प्रकार लातूरमध्ये गत आठवड्यात घडला होता. या प्रकरणी लातूर पोलिसांनी गतीने तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली होती. दरम्यान, चव्हाण यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले गावठी पिस्तूल परळीतून आणल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. लातूर पोलिसांनीही त्या दिशेने तपास केला परंतु, पिस्तूल परळी नव्हे तर केजमधून शार्पशुटरकडे गेल्याची नवीन माहिती समोर आली. यावरून रविवारी लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी केज शहरातील समर्थनगर भागात राहणाऱ्या रमेश मुंडे याला अटक केली. त्याने पिस्तूल पुरवल्याची कबुलीही दिली आहे. 


चौकशी सुरू 
रमेश याने पिस्तूल कुठून आणले? किती रुपयांना ते विकले? त्याला यासाठी इतर कुणी मदत केली? यासाठी रमेशकडे पोलिस अधिक चौकशी करत आहेत. त्याने दिलेल्या माहितीतून आणखीही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून त्यांच्या अटकेची शक्यता आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...