आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेसाठी आज मतदान, युती-काँग्रेस आघाडीत रस्सीखेच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शनिवारपासून (दि.१९) सुरू झालेल्या घोडेबाजाराच्या प्रश्नावरून नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा राजकीय समीकरणे जुळवण्याचे आटोकाट प्रयत्न जिल्हा ते राज्यपातळीवरील नेते मंडळींना करावे लागले.  आता ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच होणार  आह.  दरम्यान, सोमवारी  या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया होणार   आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदानाची प्रक्रिया होणार असून ५०३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 

 
काँग्रेस आघाडीचे माजी आमदार सुरेश देशमुख, युतीचे विप्लव बाजोरिया व अपक्ष सुरेश नागरे हे तिघे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपचे सुरेश नागरे यांनी दोनच दिवसांपूर्वी निवडणुकीतून माघार घेत आपला पाठिंबा युतीचे उमेदवार बाजोरीया यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर निवडणूक दुरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले असताना घोडेबाजारही अधिकच वाढेल, अशी अपेक्षा मतदारांत असताना काँग्रेसचे श्री देशमुख यांनी अचानक वेगळी भूमिका घेतल्याने मतदारांत संभ्रम निर्माण झाला. घोडेबाजारात श्री देशमुखांची माघार राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसच्याही  स्थानिक व राज्य पातळीवरील नेत्यांपर्यंत गेल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आ.अमरनाथ राजूरकर व माजी मंत्री डि.पी.सावंत यांना परभणीत पाठवून दोन्ही काँग्रेसच्या नेतेमंडळींत चर्चा घडवून आणली.

 

देशमुखांमुळे मतांना भाव  
राजकीय समीकरणे जुळवताना घोडेबाजारात मताचा भावही वाढल्याने या नेते मंडळींनी कसरत केली. या दरम्यान, अपक्ष  नागरे यांनाही पुढे करण्याचा दिवसभर प्रयत्न केला गेला. मात्र, यात काँग्रेसची मोठी नाचक्की झाली असती, ही बाब लक्षात घेऊन देशमुखांना या स्पर्धेत सर्वार्थाने उतरवण्यासाठी  झालेल्या प्रयत्नांना रविवारी  सायंकाळी यश आल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले. त्यानंतर घोडेबाजार अधिक तेजीत आला. याच दरम्यान, दुसरीकडे शिवसेनेच्या नेतेमंडळींनी बाजोरिया यांच्यासाठी मतदारांची जुळवाजुळव करताना शिवसेना, भाजपसह अपक्ष व स्थानिक आघाडीच्या मतदारांना सर्वार्थाने सोबत घेण्याचे प्रयत्न दिवसरात्र सुरू ठेवले आहेत. रविवारी रात्रीतून या घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता अाहे. 

 

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या  मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला

 

विधान परिषद निवडणुकीसाठी सोमवारी   तीन जिल्ह्यांतील २९ मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. निवडणूक विभागाने ३ मे रोजीच्या अंतिम मतदार यादीत ज्यांचा समावेश अाहे त्यांना मतदानाचा हक्क राहील असे जाहीर केल्याने मागील काही दिवसांत झालेल्या अपात्रतेच्या कारवाईतील सदस्यांना दिलासा मिळाला आहे. 


उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया होणार आहे.  अटीतटीच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकोप्याची घोषणा केली आहे. मात्र, मतदानानंतरच या मनोमिलनावर शिक्कामोर्तब होईल.दुसरीकडे शिवसेनेने रविवारी सायंकाळपर्यंत आपली भूमिका जाहीर केलेली नसली तरी अंतर्गत पातळीवर पाठबळ देण्याबाबत निर्णय झाला असल्याचे समजले.  तीन जिल्ह्यात एकूण १००५ मतदार असून त्यांच्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असे एकूण २९ मतदान केंद्र आहेत.

 

यासाठी १४ उपविभागीय अधिकारी झोनल अधिकारी म्हणून, २९ तहसीलदार केंद्राध्यक्ष म्हणून तर १४५ मतदान अधिकारी, प्रत्येक केंद्रावर २ प्रमाणे ५८ मतदारांना ओळखणारे स्थानिक संस्थेचे कर्मचारी, प्रत्येक केंद्रात एक पोलिस अधिकारी ४ कर्मचारी तसेच परिसरामध्ये बाहेरच्या बाजूला स्वतंत्र बंदोबस्त राहणार आहे.  मतपेट्या तीनही जिल्ह्यातून उस्मानाबादेत तहसील कार्यालयात आणल्या जातील. 

 

हिंगोली : ३ मतदान केंद्रे, १७९ मतदार

परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार असून या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १७९ मतदार मतदान करणार असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात तीन मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये हिंगोली येथील मतदान केंद्रावर १०९ मतदार आहेत. तर वसमत येथील मतदान केंद्रावर ५१ आणि कळमनुरी येथील मतदान केंद्रावर १९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख आणि शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार विप्लव बाजोरिया हे एकमेकासमोर उभे ठाकले आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...