आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोतकरांची उचलबांगडी करत रामदास कदम यांची नांदेड पालकमंत्रिपदी वर्णी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नांदेड- नांदेडचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांना मुख्यमंत्र्यांनी अखेर घरचा रस्ता दाखवला. कोरेगाव भीमा प्रकरणावरून नांदेड जिल्हा सतत तीन दिवस धुमसत होता. त्यातच हदगाव तालुक्यात पोलिसाने वाहनातून लाठी मारल्याने दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यात अस्वस्थतेचे वातावरण असतानाही पालकमंत्री खोतकरांची पावले नांदेडमध्ये पडली नाहीत. मागील वर्षभरात अर्जुन खोतकर केवळ जिल्हा नियोजन मंडळाची बैठक, राष्ट्रीय सणाचे झेंडावंदन वगळता क्वचितच नांदेडला येत असत. त्यामुळे अखेर त्यांची नांदेडच्या पालकमंत्रीपदावरून उचलबांगडी करून त्याजागी औरंगाबादचे पालकमंत्री असलेले पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची वर्णी लावण्यात आली आहे. 


वर्षभरापूर्वी  खोतकर यांची नांदेडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली होती.  मात्र, खोतकर हे नांदेडमध्ये रमलेच नाहीत. त्यांचे चित्त सतत जालन्यातच अडकून होते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या राष्ट्रीय सणाचे झेंडावंदन व जिल्हा नियोजन मंडळाची बैठक वगळता ते क्वचितच नांदेडला येत असत. महापालिका निवडणुकीच्या वेळी ते नांदेडमध्ये मुक्काम ठोकून होते. मात्र, मनपा निवडणुकीत सेनेला केवळ एकच जागा मिळाली. त्यानंतर किनवट नगर पालिकेच्या निवडणुकीतही शिवसेनेच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे चांगले वर्चस्व असलेल्या शिवसेनेला एकामागून एक पराभवाचे धक्के बसत होते. त्यातच आमदार प्रतापराव पाटील हे तर केवळ आमदारकी टिकवण्यासाठी शिवसेनेत आहेत. कर्तृत्वाने ते कधीच भाजपवासी झाले आहेत. या एकामागून एक बसणाऱ्या धक्क्यांमुळेही  खोतकरांना नांदेडला यावेसे वाटले नसावे. 


दंगलीदरम्यान नांदेडला न येणे भोवले :  कोरेगाव भीमा येथे  झालेल्या दंगलीचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरले होते. नांदेड शहरातही दंगलसदृश्य परिस्थिती होती. पोलिसांची व्हॅन फोडण्यात आली. यात चार पोलिस जखमी झाले. हदगाव तालुक्यातील आष्टी येथे पोलिसांच्या लाठीमारात  दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री   खोतकर यांनी नांदेडला येणे अपेक्षित होते. मात्र, ते इकडे फिरकलेच नाहीत. विशेष म्हणजे आष्टी हे गाव सेनेचे आमदार असलेले नागेश पाटील आष्टीकर यांचे गाव आहे. किमान तेथे सेनेचे मंत्री म्हणून नाहीतर पालकमंत्री म्हणून तरी  खोतकरांनी जाणे अपेक्षित होते. मात्र, ते नांदेडला फिरकलेच नसल्यामुळे त्यांना पालकमंत्रीपदावरून हटवले गेले.

 

नव्या पालकमंत्र्यांकडूनही अपेक्षा 
कदम यांच्याकडून जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मनपा निवडणुकीदरम्यान ते  नांदेडला अनेकदा आले होते. त्यापूर्वीही ते आले होते. विशेष म्हणजे गोदावरी नदीत नाल्याचे पाणी सोडल्याच्या कारणावरून त्यांनी गोदावरी नदीची पाहणी केली होती. तसेच नाल्याचे पाणी सोडणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन त्यांनी कामाची चुणूक दाखवून दिली होती. त्यामुळे त्यांच्याकडूनही जनतेच्यो अपेक्षा वाढल्या आहेत.