आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेज (बीड)- विडा येथील पाणी पुरवठा योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करून ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावी या मागणीसाठी शनिवारी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवरून चढून शोले स्टाइल आंदोलन केले. यावेळी सोमवारी योजना कार्यान्वित करण्याचे आश्वासन डेप्युटी सीईओंनी दिल्यानंतर आंदोलनकर्ते खाली उतरले.
विडा येथे सन 2008 साली एक कोटी 87 लाख रूपयांची पाणीपुरवठा योजना मंजुर झाली होती. येथील पाणी पुरवठा समितीने सांगवी सारणी येथील साठवण तलावावर विहीरीचे अपूर्ण काम करून गावात पाईपलाईनद्वारे पाणी आणले. मात्र निकृष्ट दर्जाचे पाईप वापरल्याने ठीकठीकाणी फुटले. त्यामुळे पाईपलाईन निकामी झाली. गावात बांधलेल्या पाण्याच्या टाकीवर फिल्टर बसविण्यात आले नाही. या योजनेवर कोट्यावधी रुपये खर्च करून ही योजनेचे काम अपूर्ण राहिल्याने तलावात मुबलक पाणी साठा असताना ही ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे सदर योजनेचे मुल्यांकन करुन अपूर्ण काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे वेळोवेळी करून ही दुर्लक्ष केले जात होते. परिणामी, आक्रमक बनलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सदरील पाणी पुरवठा समितीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करून योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावी या मागणीसाठी शनिवारी सकाळी 10 वाजता पाण्याच्या टाकीवरून उड्या मारून सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.
शनिवारी सकाळी 10 वाजता उपसरपंच बापुराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य अशोक वाघमारे, शिवाजी वाघमारे, सुहास पवार, पराक्रम घुटे, वसंत शिंदे, सुंदर देवगुडे, कल्याण घाडगे, शुभम पटाईत या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढले. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता पवार व पोलिसांनी मागण्याची पूर्तता करण्याचे आश्वासन देऊन कार्यकर्त्यांना खाली उतरण्याची विनंती केली. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळाल्यावर खाली उतरू असा पवित्रा घेतला होता. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भोकरे यांना विड्याला पाठविले. यावेळी डॉ. भोकरे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून सोमवारी योजना कार्यन्वित करण्याचे व योजनेचे मूल्यांकन करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेत आंदोलनकर्ते टाकीवरून खाली उतरले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.