आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड- विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी देता येईल ते योगदान देण्यासाठी सदैव सज्ज राहावे. सत्यनिष्ठा आणि देशाप्रती जाणीव जागृत ठेवून काम केल्यास स्वतः बरोबरच राष्ट्राची प्रगती साधता येईल. तसेच कोणत्याही प्रकारचा जाती, धर्म, पंथ व भेदभावाचा विचार न करता समता, बंधुता आणि एकता या तत्त्वांप्रती तसेच माता-पित्यांप्रती आदर ठेवावा, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
विद्यापीठाच्या प्रांगणात दीक्षांत प्रदानाचा शानदार समारंभ झाला. याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आयसीएमआरचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध मानवविज्ञान शास्त्रज्ञ प्रा. रामचंद्र मुटाटकर, कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, परीक्षा मूल्यमापन व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे यांच्यासह अप्पर विभागीय आयुक्त विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, मनपा आयुक्त गणेश देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. दीक्षांत भाषणात बोलताना डॉ. मुटाटकर म्हणाले की, भारतीय विद्यापीठाने स्वतंत्र आणि एकमेकांच्या साहाय्याने सर्व मानवी समस्यांचे निराकरण करण्याची भूमिका घेतली पाहिजे.
महाविद्यालयीन व विद्यापीठातील शिक्षकांनी यूजीसीच्या निर्देशाप्रमाणे शिक्षण आणि संशोधन केले पाहिजे. विज्ञान शाखेने उद्योगाशी निगडित संशोधन तर मानव्य विद्याशाखा आणि सामाजिक शास्त्रे यांनी समाज उपयोगी उपक्रमात सहभाग देणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. कुलगुरू डॅा. विद्यासागर यांनी विद्यापीठापुढे गुणवत्ता वाढ, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण, नवीन अध्ययन आणि अध्यापन पद्धतीचा अवलंब करणे अशी अनेक आव्हाने उभी असल्याचे सांगून २० वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय मूल्यांकन तथा अधिस्वीकृती परिषद (नॅक) चा अ दर्जा मिळवणाऱ्या या विद्यापीठाने गेल्या एक वर्षांच्या कालावधीत अनेक आव्हानात्मक निर्णय घेऊन ते यशस्वीपणे राबवले आहेत. पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर निवडीवर आधारित श्रेयांक पद्धत राबवणारे महाराष्ट्रातील हे पहिले विद्यापीठ असल्याचे सांगितले.
मिरवणुकीने आले मान्यवर
प्रारंभी विद्यापीठाच्या प्रांगणातून दीक्षांत मिरवणुकीतून मान्यवरांचे दीक्षांत समारंभाच्या मंचावर आगमन झाले. एमजीएम महाविद्यालयाच्या चमूने विद्यापीठ गीत सादर केले. कुलपती सी विद्यासागर राव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.