आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेताच्या वाटणीचा वाद; सून, मुलाने केला बापाचा खून;कन्‍नड तालूक्‍यामधील निंभोरा येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिशोर- निंभोरा (ता.कन्नड) येथे शेताच्या वाटणीच्या वादातून सख्ख्या मुलाने व सुनेने वृद्ध बापाचा खून केल्याची घटना घडली. याविषयी पिशोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निंभोरा (ता.कन्नड) येथील कारभारी सांडू सोनवणे (६५) यांची निंभोरा शिवारात २० एकर जमीन आहे. कारभारी सोनवणे यांचा एकुलता एक मुलगा  हरी व त्याची पत्नी सुनीता यांचा मृत कारभारी सोनवणे यांच्याशी कायम जमीन वाटपावरून वाद होत असे.  


याच वादातून सोमवारी (ता.५) दुपारी तीन वाजेदरम्यान कारभारी सोनवणे यांचे मुलगा व सून यांचे शेतातच कडाक्याचे भांडण झाले. या वेळी मुलाने व सुनेने कारभारी सोनवणे याना बांबूच्या काठीने मारहाण केली. यात सोनवणे हे जागीच गतप्राण झाले. यानंतर दोन्ही आरोपी कोणास काही न सांगता पुरावा नष्ट करण्याचा हेतूने मृतास शेतातील घरात टाकून गावात 
निघून आले.  


आरोपींनी मृत सोनवणे यांच्या अंत्यसंस्काराची गुपचूप तयारी चालवली असताना पिशोर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे यांना आलेल्या निनावी फोनमुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक तपास केला. उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी नीरज राजगुरू व सपोनि मोरे यांनी घटनेची अधिक माहिती घेऊन मृताच्या शरीरावरील मारहाणीच्या खुणांसंदर्भात मुलास व सुनेस विचारपूस केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. दोघांवर पुरावा नष्ट करून खून केल्याचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली.याविषयी अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिजित मोरे, पोलिस उपनिरीक्षक जयराज भटकर, पोलिस कर्मचारी संजय देवरे, संजय आटोळे, सुनील ढेरे, रवींद्र देशमुख, सतीश देवकर, मालोदे आदी तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...