आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांची वेदनेमुळे तडफड, डॉक्टर रंगपंचमी खेळले! पुरुष कक्षात रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनील पालखे, रुग्ण, शिंगोली. - Divya Marathi
सुनील पालखे, रुग्ण, शिंगोली.

उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर गायब झाल्यामुळे मंगळवारचा (दि. ६) दिवस रुग्णांना वेदनेने तळमळत  काढावा लागला. सकाळपासून रुग्ण डाॅक्टरांच्या प्रतीक्षेत होते. काहींनी डॉक्टर रंगपंचमी खेळायला गेले असल्याचे सांगितल्यामुळे रुग्णांचा संयम सुटत होता. डॉक्टरांची अशी कामाला दांडी मारण्याचे प्रकार वाढले आहेत. तरीही प्रशासन ठोस उपाययोजना करत नसल्यामुळे नाराजी वाढली आहे. 


याच आठवड्यात जिल्ह्यात सर्वात मोठे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. एक लाख २२ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. एकीकडे अशी शिबिरे होत असताना दुसरीकडे मात्र, स्थानिक आरोग्य सेवा कोलमडण्याचे प्रकार घडत आहेत.  जिल्हा रुग्णालय याचे मोठे उदाहरण आहे.  मंगळवारी सकाळपासून एकही डॉक्टर पुरुषांच्या सर्जिकल वार्डामध्ये फिरकले नाहीत. यामुळे अनेक रुग्णांना वेदनेने तळमळत त्यांची प्रतीक्षा करावी लागत होती. सोमवारी दुपारच्या दरम्यान डॉक्टरांनी तपासणी केली होती. काहींना केवळ सलाइन लावण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार एखादी बाटली सलाइन आरोग्य कर्मचाऱ्यांनी लावले. त्यांनंतर रुग्णांकडे कोणीच फिरकले नाही.  रुग्ण सातत्याने डाॅक्टरांना बोलावण्याची विनंती करत होते. मात्र, त्यांना कोणीही दाद देत नव्हते. आरोग्य सेविका केवळ डाॅक्टर येतील आम्हाला बोला, असे सांगत होते.  वार्डात काही पोटदुखीने त्रस्त तसेच अपघातग्रस्त रुग्ण हाेते. त्यांची अवस्था  दयनीय झाली होती. काही जण वेदनेने विव्हळत होते. त्यांचे नातेवाइकही सातत्याने डॉक्टरांना बोलावण्याची विनवणी करत होते. काहींनी रुग्णांना डाॅक्टर रंगपंचमी खेळण्यासाठी गेले असल्याचे सांगितले. तेव्हा तर अनेकांचा संयम सुटत होता. 

 

रुग्णालय सोडता येईना 
काही रुग्ण डाॅक्टर येत नसल्यामुळे दुसरीकडे जाण्यासाठी डिस्चार्ज मागत होते. मात्र, तांत्रिकदृष्ट्या डॉक्टर नसल्यामुळे त्यांना रेफर करण्यासाठी अडचण येत होती. काही रुग्णांचे उपचार संपले होते. त्यांनाही रुग्णालय सोडता येत नव्हते. यामुळे त्यांना सकाळपासून ताटकळत बसावे लागले. 

 

वरिष्ठांचे दुर्लक्ष 
काही रुग्णांच्या नातेवाइकांनी दुपारनंतर  अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राज गलांडे यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने डॉक्टरांना मोबाइलवर संपर्क साधून वार्डात जाण्यास सांगितले. त्यानंतर तरी डॉक्टर तपासणी करतील अशी अपेक्षा होती. पण डॉक्टर वार्डात गेलेच नाहीत. 

 

वेदनेने मरायची वेळ 
वेदनेमुळे मोठा त्रास होत आहे. तरीही मंगळवारी डॉक्टर तपासायला आले नाहीत. येथील सिस्टरला डाॅक्टरांना बोलावण्याची विनंती केली. परंतु, त्यांनीही दुर्लक्ष केले. 

- रविकांत राठोड, रुग्ण, जहागीरदारवाडी. 


फक्त एक सलाइन 
केवळ एक सलाइन लावण्यात आले आहे. किती दिवस उपचार घ्यावे लागतील याबाबत माहिती दिली नाही. दुसरे उपचारही सुरू  नाहीत. 
- सुनील पालखे, रुग्ण, शिंगोली.

बातम्या आणखी आहेत...