आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्तावित रेल्वे डबे प्रकल्पाचा बजेटमध्ये ओळीचाही उल्लेख नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लातूर जिल्ह्यातील टेंबी येथे रेल्वे बोगी तयार करण्याच्या कारखान्याला रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मंजुरी दिल्याचे ट्विट मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. मात्र गुरुवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात रेल्वेविषयक बाबींमध्ये लातूरच्या प्रस्तावित कारखान्यासाठी आर्थिक तरतूद तर सोडाच पण या अनुषंगाने एका ओळीचाही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे कारखान्याच्या घोषणेबद्दल लातूरकरांच्या मनात साशंकता आहे.


बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या टेंबी येथे रेल्वे डबे बनवण्याच्या कारखान्याला मंजुरी दिल्याचे ट्विटरवरून जाहीर केले होते. कोणतीही मागणी नसताना अनपेक्षितपणे झालेल्या या घोषणेमुळे लातूरकरांना आनंदयुक्त आश्चर्याचा धक्का बसला. अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला याबाबतची घोषणा झाल्यामुळे कदाचित अर्थसंकल्पात यासंबंधीची काहीतरी आर्थिक तरतूद केली असावी, असा कयास लावला जात होता. परंतु गुरुवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात रेल्वेविषयक बाबींमध्ये आर्थिक तरतूद वगैरे दूरची बात पण साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प लातूरला होईल की नाही याबद्दल साशंकता आहे. 


अमित देशमुखांकडून आभार आणि साशंकताही :   लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी टेंबीच्या रेल्वे डब्याचा प्रकल्प लातूर जिल्ह्यात मंजूर केल्याबद्दल आनंद व्यक्त करून या प्रकल्पासाठी संपूर्ण सहकार्य आणि पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि खासदारांचे आभारही मानले आहेत. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी टेंबी येथे केंद्रीय प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी त्यावेळी अधिग्रहीत केलेल्या जागेवरच हा रेल्वे डबे तयार करण्याचा प्रकल्प होणार आहे, याचे लातूरकरांना मनस्वी समाधान असल्याचेही  अधोरेखित केले आहे. मात्र याच वेळी त्यांनी मागच्या तीन वर्षांत केंद्र आणि राज्य शासनाने अनेक निर्णय जाहीर केले आणि घोषणाही केल्या. परंतु त्याचे पुढे काहीच झालेले नाही. अर्थसंकल्पात या प्रकल्पाबाबत ठळक उल्लेख झालेला नाही. त्यामुळे त्या संदर्भात अधिक स्पष्टता होणे गरजेचे आहे. केंद्र शासनाच्या इतर घोषणांप्रमाणे टेंबी प्रकल्पाचेही होऊ नये एवढी अपेक्षा असल्याचेही शेवटी आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

 

पालकमंत्र्यांचा मात्र दावा
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प लातूरला होणारच, असा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर या प्रकल्पात लातूर, उस्मानाबाद परिसरातील किमान ५०  हजार स्थानिकांना त्यात प्रत्यक्ष –अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असाही दावा केला आहे. टेंबीच्या परिसरात पाण्याची उपलब्धता नाही. त्याबद्दल अद्यापर्यंत शाश्वत सोय केलेली नाही. यावरही गुरुवारी दिवसभर लोकांकडून साशंकता व्यक्त करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...