आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्या 4 दिवसांसाठी शिक्षिकांनी शाळेतच तयार केली चेंजिंग रूम; देताहेत मोफत पॅड!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - वयात येणाऱ्या मुलींसाठी मासिक पाळीतील चार-पाच दिवस त्रासाचे असतात. त्यातच शालेय विद्यार्थिनी ही अडचण सांगण्यास संकोच करतात. त्याचा परिणाम शाळेतील उपस्थितीवरही जाणवतो. अनेक मुली महिन्यातील त्या दिवसांमध्ये शाळेत गैरहजर असतात हे लक्षात घेत  जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षिकेने शाळेतच चेंजिंग रूम तयार करण्याची संकल्पना राबवली. ह्या उपक्रमापासून प्रेरित होऊन आज जिल्ह्यातील जवळपास ११ शाळांतील शिक्षिका स्वखर्चातून मुलींना पॅड वाटप करत आहेत. यामुळे मुलींचे शाळेतील हजेरीचे प्रमाण वाढले आहे. 


बाराव्या किंवा तेराव्या वर्षातच मुलींना मासिक पाळी सुरू होत आहे. या शरीरिक बदलामुळे काही मुली घाबरून जातात. ग्रामीण भागात या काळात मुलींवर अनेक बंधने घातली जात असल्याने मुली या विषयावर उघडपणे बोलत नाहीत. या दिवसांमध्ये  मुली त्रस्त असल्याने  शाळेत जाण्याचे टाळतात, असेे बाभुळगाव येथील  शिक्षिका स्वाती चित्ते यांच्या लक्षात आले. सातवी ते दहावीपर्यंतच्या वर्गांना त्या शिकवतात.  या शाळेत जवळपास १०० विद्यार्थिनी आहेत. मुलींच्या गैरहजेरीची  समस्या लक्षात घेऊन चित्ते यांनी मुलींशी संवाद साधण्यास सुरुवात केली.  सुरुवातीला मुलींनी संकोच करीत यासंदर्भात बोलणे टाळले. त्यामुळे चित्ते यांनी  मुलींना शास्त्रीय माहिती देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आता या मुली आपल्या आईशी ज्या विश्वासाने बोलतात तशाच चित्ते यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधत आहेत. यातूनच मुलींसाठी चेंजिंग रुम असावी हे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी मुलींसाठी शाळेतच चेंजिंग रुम उभारली. 


मोठ्या मुली बनल्या गाइड

 शिक्षिकेच्या पुढाकारातून उभारलेल्या चेंजिंग रुमचा वापर सातवी ते दहावीच्या वर्गातील मुली करत आहेत.  काही मोठ्या मुली  नवख्या मुलींसाठी गाइडचे काम करत आहेत. या उपक्रमाची नाटिका शिक्षिकेने विद्यार्थिनींच्या मदतीने जिल्हा क्रीडा उत्सवातही सादर केली. यापासून प्रेरणा घेत अनेक शाळांनी मुलींसाठी शाळेत स्वतंत्र चेंजिंग रुम उपलब्ध करून दिली.  काही शिक्षिका स्वत:च्या पैशांतून मुलींना पॅड उपलब्ध करून देत आहेत. 

 

या शिक्षिकांचा पुढाकार 
 जि. प. प्राथमिक शाळा देवमूर्ती येथील प्रफुल्लता बळीराम भिंगोले, केंद्रीय कन्या विद्यालय भोकरदन येथील चारुलता इंगळे, जिल्हा परिषद शाळा सिपोरा बाजार (ता. भोकरदन) येथील ज्योती  खैरे, जि. प. शाळा हिसोडा (भेाकरदन) येथील प्रीती  पवार, जि.प. शाळा गवळीपोखरी येथील वनिता  आचार्य, जि.प. शाळा मजरेवाडी येथील शिक्षिका रेखा कलवले, जि.प. शाळा खणेपुरी येथील शिल्पा पोलास, जि.प. शाळा सिंधी काळेगाव येथील शिक्षिका बिडकर, तर नाशिक जिल्ह्यातील जि.प. प्रा.शा. धनगरपाडे येथील शाळेतील ज्योती  पगारे, धुळे जिल्ह्यातील जि.प. शाळा कळंबीरच्या प्रज्ञा प्रभाकर नेरे या मुलींना मोफत पॅड देत आहेत.

 

अाम्हीच पुरवतो मुलींना पॅड
चेंजिंग रूमच्या संकल्पनेतून मुलींच्या शाळेतील त्या चार दिवसांच्या गैरहजेरीचे कारण लक्षात आले.  त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या अडचणी पुढे आल्या. त्या दूर करण्यासाठी आम्ही शिक्षिकांनी पुढाकार घेत मुलींना माहिती दिली. शिवाय मोफत पॅड पुरवण्यासाठी पुढाकार घेतला. वर्षभरापासून मुलींच्या उपस्थितीचे प्रमाण वाढले आहे. 
प्रफुल्लता बळीराम भिंगोले, शिक्षिका,जि.प. प्रा.शा.  देवमूर्ती, ता.जालना

बातम्या आणखी आहेत...